कराड - महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जातायेत. ते महाराष्ट्रातच होतंय. कारण केंद्रात एक अदृश्य शक्ती आहे ज्याला महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे आहे. हे केवळ राष्ट्रवादी, शिवसेनापुरते मर्यादित नाही तर भाजपातील मराठी नेत्यांवरही ते घात करतायेत. मराठी माणसाच्या विरोधात मोठं षडयंत्र केंद्र सरकार, अदृश्य शक्ती रचतंय असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संस्कार, मराठी संस्कृती काय असते? राजकारणात ती कशी पाळली पाहिजे? त्याच्या मर्यादा काय आहेत या सगळ्याचा आदर्श यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. त्या आदर्शाने आपण चालत राहिलो तर सध्याच्या राजकीय गोष्टी निश्चित अस्वस्थ करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात जी अस्वस्थता आहे त्यामुळे राज्यातील मायबाप जनतेचे नुकसान होतंय. २०० आमदारांचे सरकार आहे पण त्यात स्थिरपणा नाही. त्यात महाराष्ट्राच्या विकासाचे नुकसान होतंय. आम्ही दिल्लीतून जेव्हा पाहतो, तेव्हा गेल्या एक दीड वर्षात महाराष्ट्राचा विकास मंदावल्याचे चिंताजनक चित्र दिसते. हा राजकीय नाही तर सामाजिक विषय आहे असा निशाणा त्यांनी साधला.
गृहमंत्र्यांचा दर्जा घसरलामहाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ, पिण्याचे पाणी...आज शहरात गेले तर पाणीटंचाई आहे. गावाकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे दुष्काळ आणि पाण्याचे नियोजन याचे मोठं आव्हान राज्यासमोर आहे. गृहमंत्र्यांचे अपयश आहे. अनेक वर्ष जे यशस्वी गृहमंत्री राहिले पण या टर्ममध्ये असं काय झालं ज्यामुळे त्याच गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नाही याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लीम समाज यांना आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले. जेव्हा भाजपात अटलजी, सुष्माजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली पक्ष बघायचे तेव्हा तो भाजपा पक्ष होता. पण आज दुर्दैवाने या सगळ्यांनी जे योगदान दिले. कार्यकर्त्यांनी भाजपाला सत्तेत आणले. त्या कष्टकरी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काही केले. परंतु आज खूप मोठा बदल या पक्षात झाला आहे. ते भ्रष्ट जुमला पार्टी झाले आहेत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवाआरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्यावर जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने यावर विशेष अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी. मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजाच्या आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. या चर्चेला आम्ही तयार आहोत आणि पूर्ण ताकदीने आमचा पाठिंबा आहे. महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ यावर सरकार बोलत नाही. राजस्थानमध्ये निवडणूक म्हणून ४५० रुपयाला सिलेंडर आणि महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून १२०० रुपये सिलेंडर आहे. दुष्काळाची झळ सगळ्यांना बसतेय. अनेक शहरात पाणीटंचाई आहे. ट्रिपल इंजिन सरकार राज्यात विकासासाठी सत्तेत आले म्हणतात परंतु राज्यात विकास सोडून इतर सर्वकाही सुरू आहे असा आरोपही सुळेंनी केला.