मुंबई, दि. 1 - बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी 30 जुलै रोजी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. तस्लीमा यांचा दौरा रद्द झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तस्लीमा यांचा दौरा पुर्णपणे खासगी होता, ज्याची माहिती फक्त पोलिसांना होती. अशा परिस्थितीत ही माहिती लीक कशी झाली असा प्रश्न विचारला जात आहे.
शनिवारी औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले होते. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी तीन दिवसांच्या दौ-यानिमित्त तस्लीमा नसरीन औरंगाबादमध्ये आल्या होत्या. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले होते.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन औरंगाबादेत विमानाने येत असून त्या हॉटेल ताज येथे मुक्कामी थांबणार आहेत,अशी माहिती शहरात पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल ताज आणि चिकलठाणा विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली आणि घोषणाबाजी करण्यास सुरवात केली होती.
मात्र हे सर्व जाणुनबुजून करण्यात आल्याचा आरोप तस्लीमा नसरीन यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. तस्लीमा नसरीन यांच्या दौ-याची माहिती बाहेर कशी आली याची माहिती पोलीस सध्या घेत आहेत. नसरीन यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं होतं की, 'औरंगाबाद पोलिसांशिवाय माझ्या हॉटेल बुकिंग आणि दौ-याची माहिती कोणालाच माहिती नव्हती. मग कट्टरपथियांना ही सगळी माहिती कशी मिळाली याचं आश्चर्य वाटतं'.
तस्लीमा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमा यांची फ्लाईट डिटेल्स, हॉटेल बुकिंग आणि चार दिवसांच्या दौ-यासंबंधी माहितीचे कागदपत्र प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. दिल्लीमध्ये तस्लीमा नसरीन यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्ली पोलीस अशा दौ-यांवेळी स्थानिक पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवतं. 27 जुलै रोजी औरंगाबाद पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचा आदेश देण्यात आला होता. इतकंच नाही हॉटेलचं बुकिंगही दुस-या नावे करण्यात आलं होतं'.
काय झालं होतं नेमकं -आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही, असा इशारा दिला होता. एअर इंडियाच्या विमानाने रात्री साडेसात वाजता तस्लीमा विमातळावर येताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तिची भेट घेतली आणि मॅडम तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी तस्लीमा यांनी त्यांचा नियोजित दौरा अत्यंत गुप्त असल्याचे पो.नि.परोपकारी यांना सांगितले होते. तेव्हा परोपकारी यांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही.तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहात,कोठे जाणार आहात,याबाबतची माहिती संपूर्ण शहरात पसरली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही परत जा,अशी विनंती केली. एवढेच नव्हे तर विमानतळ अधिका-यांशी संपर्क साधून तस्लीमा आणि त्यांच्या मुलीला परत घेऊन जाण्याची विनंती केली होती.