औरंगाबाद - आम्ही इतके घाणेरडे राजकारण करणार नाही. सध्या दोन्ही शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावर राजकारण करतेय ते खूप घातक आहे. मुंबईत गुजराती लोकांचा ठसा उमटवायचा आहे. सर्वकाही गुजराती लोकांच्या हातात देण्याचं षडयंत्र सुरू आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी ही अहमदाबाद नाही तर मुंबई आहे असं सांगत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, गुजराती लोकांना मुंबईत बसवायचं आहे. कामगार गुजराती पाहिजे, उद्योगपती गुजराती पाहिजे. गुजराती लोकांना महाराष्ट्रात कसं आणायचं हे षडयंत्र सुरू आहे. आर्थिक राजधानी मुंबई आहे. गुजराती लोकांचा ठसा मुंबईत उमटवत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक संपू द्या. गुजराती लोकांची हुकुमत मुंबईवर ठेवायची आहे हे लोकांना अद्याप कळालं नाही. सध्या हे दुर्दैवी राजकारण आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले. दर ५ वर्षांनी केवळ हिंदुबाबत बोलून चालणार नाही. मुलभूत विकास कामांवर बोला, पाणीप्रश्नावर बोला. लोकांना आता पर्याय दिसू लागला आहे. MIM खासदार निवडून आल्यावर दंगली होणार असं म्हटलं. कुठे झाली दंगल? आम्ही सगळ्यांची कामे करतोय. एकमेकांवर चिखलफेक करण्याचं काम इतर राजकीय नेते करतायेत. परंतु ठोस कार्यक्रमावर कुणी काही बोलत नाही. अंधेरीची पोटनिवडणूक रस्त्यावर कशी लढाई होईल हे दिसणार आहे असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत पुढील महापौर MIM चा होईल. आम्ही विरोधी पक्षात होतो. आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केली. खान पाहिजे की बाण पाहिजे आता बाण गेला. औरंगाबादकरांना औरंगाबाद पाहिजे. नावही मिटलं आणि चिन्हही मिटले. नाव बदलून काय साध्य केले? निवडणूक आल्यावर औरंगाबाद पाहिजे की संभाजीनगर हवं असं विचारायचं. बाण राहिला असता तरी खान आला असता असा टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मराठी माणसं फोडण्याचं पाप
अमित शाह आणि मंडळींनी मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम केले. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी देणेघेणे नाही. जे कुणाला जमलं नाही ते अमित शाह यांनी मराठी माणसांना कमकुवत करण्याचं पाप केले आहे अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"