छत्रपती संभाजीनगर - अजित पवार हे मोठे नेते आहे. ते स्पष्ट बोलतात. काम होणार असेल तर तातडीने करतात. जर नसेल होणार तर तोंडावर सांगतात. त्यांची ही धमक आहे. पण त्यांच्या या कार्यशैलीचा काही लोकांना त्रास होतोय. त्यामुळे अजित पवारांचे वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र त्या नेत्यांकडून केले जात आहे. पण अजित पवार दबणारा माणूस नाही. पक्ष कोणताही असो अजित पवार स्वत:चे वर्चस्व निर्माण करणारा नेता आहे अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अजितदादांचे कौतुक केले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, १ तारखेला मविआची सैल झालेली वज्रमूठ सभा असेल त्यात अजित पवारांना खुर्चीही नसणार आहे. कार्यकारणीच्या बैठकीत अजित पवारांचे नाव नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून नाव नाही. अजित पवारांनी दूर व्हावे यासाठी जाणुनबुजून हे प्रयत्न सुरू आहेत. शेवटी तो माणूस आहे. किती दिवस हे सहन करणार? मी माझे बघून घेईल असं अजित पवारांनी म्हटलं तर त्यात काही गैर नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आता जास्त काळ अजित पवार महाविकास आघाडीत राहतील असं वाटत नाही. १ मेपर्यंत ते सोबत येतील असं वाटत नाही परंतु अजित पवारांची वाटचाल त्यादिशेने सुरू आहे. अजित पवार हे मोठे नेते आहे. त्यांना मंत्रिपदापेक्षा सन्मान महत्त्वाचा आहे. आमच्यासारख्यांना मंत्रिपदाची हाव असू शकते पण अजित पवारांना नाही. अजित पवारांचा स्वभाव मी १५ वर्षापासून पाहत आलोय त्यामुळे मी त्यांचे कौतुक करतोय असंही आमदार संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांचे विधान चुकीचेजालियनवाला हत्याकांड याची पार्श्वभूमी राऊतांना माहिती असेल. अशाप्रकारे विधान करणे चुकीचे आहे. स्थानिक आमदारांचे मत घेऊन प्रकल्प होतात. स्थानिक लोकांचा विचार करूनच प्रकल्प होतात. लोकांचा पाठिंबा नसेल तर प्रकल्प आणण्यात अर्थ नसतो. चांगला प्रकल्प येत असेल तर त्याचा कितपत विरोध करायचा आणि त्याहून होणारे नुकसान काय हे पाहून निर्णय घ्यायचे असतात अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी बारसु येथील आंदोलनावर दिली आहे.