मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील ४३ पैकी २३ मंत्र्यांचे विधानसभा मतदारसंघ एकमेकांच्या शेजारी आहेत. उद्धव ठाकरे सरकारमधील ३९ मंत्री विधानसभेचे सदस्य आहेत, तर इतर ३ विधान परिषद सदस्य आहेत. स्वत: मुख्यमंत्री ठाकरे अजून कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
शेजारी मंत्र्यांचा मतदारसंघ लाभलेल्या २३ मंत्र्यांमध्ये सर्वाधिक ९ मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबईतील ५, विदर्भातील ४, उत्तर महाराष्ट्रातील ३ आणि मराठवाड्यातील २ मंत्र्यांचा समावेश आहे. प. महाराष्ट्रात आंबेगाव वगळता मंत्री लाभलेले बाकी सर्व ९ मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. अमरावती जिल्ह्यातील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (तिवसा) व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (अचलपूर) यांचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. शेजारच्या नागपूर जिल्ह्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा काटोल आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचा सावनेर हे दोन्ही मतदारसंघ शेजारीच आहेत.
मराठवाड्यातील २ आणि नगर जिल्ह्यातील ३ असे एकूण ५ मतदारसंघ एकमेकांशी कनेक्ट आहेत. जालना जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगीला औरंगाबाद जिल्ह्यातील रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघ लागून आहे. भुमरे यांच्या पैठणला अहमदनगर जिल्ह्यातील शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ लागून आहे. गडाख यांचा नेवासाव प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी मतदारसंघ एकमेकांच्या शेजारी आहेत. राहुरीला मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ लागून आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही मंत्र्यांचे ५ मतदारसंघ एकमेकांच्या शेजारी आहेत. सातारा जिल्ह्यातील शंभुराज देसाई यांच्या पाटणला बाळासाहेब श्यामराव पाटील यांचा कराड उत्तर लागून आहे. कराड उत्तरला सांगली जिल्ह्यातील विश्वजित कदम यांचा पलूस, कडेगाव मतदारसंघ शेजारी आहे. पलूसला जयंत पाटील यांचा इस्लामपूर लागून आहे. तर इस्लामपूरच्या शेजारी कोल्हापूर जिल्ह्यातील राजेंद्र पाटील यांचा शिरोळ मतदारसंघ आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कागल (हसन मुश्रीफ) व कोल्हापूर दक्षिण (सतेज पाटील) हे मतदारसंघ लागून आहेत. वि.प. सदस्य सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती) व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (इंदापूर) यांचे मतदारसंघ लागून आहेत.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे दोघेही मतदार असलेला वांद्रे पूर्व आणि मंत्री वर्षा गायकवाड यांचा धारावी मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. अस्लम शेख (मालाड पूर्व) व सुभाष देसाई (गोरेगावचे मतदार) यांचे मतदारसंघ शेजारी आहेत.शेजारी मंत्र्यांचा मतदारसंघ असलेले मंत्रीयशोमती चंद्रकांत ठाकूर (तिवसा ), बच्चू कडू (अचलपूर), अनिल वसंतराव देशमुख (काटोल), सुनील छत्रपाल केदार (सावनेर), राजेश अंकुशराव टोपे (घनसावंगी), संदीपानराव भुमरे (पैठण), शंकरराव गडाख (नेवासा), प्राजक्त प्रसाद तनपुरे (राहुरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), अजित अनंतराव पवार (बारामती), शंभूराज देसाई (पाटण), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), विश्वजीत कदम (पलूस-कडेगाव), जयंत राजाराम पाटील (इस्लामपूर), राजेंद्र शामगोंडा पाटील (शिरोळ), हसन मुश्रीफ (कागल), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), अनिल परब (वांद्रे पूर्व), वर्षा एकनाथ गायकवाड (धारावी), सुभाष देसाई (गोरेगाव), अस्लम शेख (मालाड पश्चिम)