मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना विद्यामान आमदारांनी पुन्हा विधानसभेत निवडून जाण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात मात्र दरवेळी आमदार बदलण्याचा इतिहास असल्याने इच्छुकांना आमदारकीचे स्वप्न पडत आहे. त्यामुळे भाजपचे विद्यामान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासाठी पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोट मतदारसंघात गेल्या सहा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चार वेळा तर, भाजप आणि भारिप-बहुजन महासंघाने प्रत्येकी एक वेळा येथून आमदार निवडून आणला आहे. मात्र १९६२ पासून आजपर्यंत या मतदारसंघाने दरवेळी आमदार बदलण्याचा इतिहास कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी इच्छुकांपैकी एकाला संधी मिळत असते. मतदारसंघाचा हाच इतिहास लक्षात घेत आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी या मतदारसंघात पहायला मिळत आहे. तर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान विद्यामान आमदार भारसाकळे यांच्यासमोर असणार आहे.
२०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजप-सेना वेगवेगळी लढली होती. तर भाजपचे उमेदवार भारसाकळे यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी होत आहे. तर हीच अपेक्षा ठेवत सेनेतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सूर केली आहे. दुसरीकडे आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतदारसंघातील दरवेळी आमदार बदलण्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवत काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात नेतेमंडळी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे. त्यात जुन्या जाणत्या नेत्यांची यादी मोठी आहे.
युती झाली तर सेना-भाजपची ताकद युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील. मात्र काँग्रेसच्या मतांची यावेळी बहुचर्चित असलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे मतांमध्ये वजाबाकी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकीतील मतांची तुलना केली, तर वंचित बहुजन आघाडीने (भारिप-बमसं) सरासरी ३० हजारांवर मते घेऊन तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. त्यामुळे यावेळी अकोट मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.