धुळे : जिल्हा परिषदेंतर्गत लघुसिंचन विभागातर्फे ग्रामीण व दुर्गम भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात १६ कोटी रुपये खर्च करून १२८ सिमेंट बंधार्यांची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एऩजी़ भोईर यांनी दिली़ यंदा पावसाळ्यात पाण्याची साठवण करण्यासाठी बंधारे तयार असल्याचेही ते म्हणाले. लघुसिंचन विभागातर्फे ग्रामीण व दुर्गम भागात पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे, केटी वेअर, सिमेंट बंधारे बांधण्यात येतात़ त्यानुसार २०१३-१४ मध्ये १६ कोटी रुपये खर्च करून १२८ सिमेंट बंधार्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ सर्व बंधार्यांमध्ये अंदाजे अर्धा ते एक दशलक्ष घनफूट एवढी पाण्याची साठवण होणार आहे़ त्यामुळे अनेक शेतविहिरींच्या पातळीतही वाढ होणार आहे़ संबंधित परिसरात जल संधारणांच्या कामांना गती मिळणार आहे़ धुळे तालुक्यात १२८ पैकी २३ सिमेंट बंधार्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ शिंदखेडा तालुक्यात २८, साक्री तालुक्यात ४५ आणि शिरपूर तालुक्यात ३२ बंधार्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ बंधारे भरण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे़ पावसाच्या पाण्याने सर्व बंधारे ओसंडून वाहतील, अशी अपेक्षा भोईर यांनी व्यक्त केली आहे़ १० कोटींचा प्रस्ताव आगामी वर्षासाठी लघुसिंचन विभागाने अशाचप्रकारे ६० सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे़ त्यासाठी १० कोटी रु. निधी प्रस्तावाचे नियोजन करण्यात आले आहे़ लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर बंधारे मागणी प्रस्ताववर चर्चा होवून सिमेंट बंधारे निर्मितीचे नियोजन करण्यात येणार आहे़
जिल्ह्यात जलसाठ्यासाठी १२८ सिमेंट बंधारे तयार
By admin | Published: May 06, 2014 7:23 PM