ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 6- राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व सिंचन प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार असुन केंद्र सरकारच्या मदतीने हा निधी उभारण्यासाठी वेळ पडला तरी कर्ज रोखे उभारले जातील मात्र सर्व प्रकल्प हे पुर्ण केलेच जातील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्याकरीता जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे जिगाव प्रकल्पस्थळावर गेले होते. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात प्रत्यक्ष प्रकल्पस्थळाला भेट देणारे ना.महाजन हे पहिलेच मंत्री ठरले आहे.
प्रकल्पस्थळावर उपस्थित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधतांना महाजन यांनी येत्या तीन वर्षात जिगाव प्रकल्प पुर्ण केला जाईल व त्यासाठी हवे तर ४ हजार कोटी रूपयांचा निधी उभारल्या जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकºयांनी पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंत्र्यांना जाब विचारला असता ना.महाजन यांनी संबधीत विभागाची दूपारीच आढावा बैठक घेतली असून याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगीतले. यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, आ.चैनसुख संचेती, आ.डॉ.संजय कुटे, आमदार अॅड.आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.