खालापूर : खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शास्त्रीनगर या रहिवासी भागात असणाऱ्या नेहरू उद्यानात समाज मंदिर बांधण्याची परवानगी नगरपालिकेने दिल्याने, येथील रहिवाशांसह राजकीय, सामाजिक संघटनांनी पालिकेच्या निर्णया विरोधात संताप व्यक्त करून आक्रमक भूमिका घेतली. खोपोलीतील एकमेव सुस्थितीत असणाऱ्या उद्यानावर बांधकाम करण्यास परवानगी देवून नगरपालिकेला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच बांधकाम पाडण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी रविवारी प्रशासनास दिल्याने बांधकामावर कारवाई केली.खोपोली नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे नेमके काय चालले आहे यावर नागरिक साशंक असताना, नगर पालिकेने एका समाजाला समाज मंदिर बांधण्यासाठी शास्त्रीनगर परिसरात असणारे नेहरू उद्यानामधील जागा दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पालिकेने उद्यानाच्या भूखंडावर बांधकाम सुरु करण्यासाठी उद्यानातील खेळणी बाजूला केली आहे. नेहरू उद्यान हे खोपोलीतील एकमेव उद्यान विरंगुळ्यासाठी आहे. येथे लहान मुलांची कायमच वर्दळ असते. दरम्यान पालिकेने या ठिकाणी बांधकाम सुरु केल्याने येथील रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवला आहे. याबाबत उद्यानाचा भूखंड देताना परिसरातील रहिवाशांना कोणत्याही पद्धतीने विचारात घेतले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. नगर पालिकेच्याकारभाराबाबत कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या तक्रारी गेल्या असून, यावर ते आता काय कारवाई करतात याकडेच रहिवाशांचे लक्ष लागले होते. मात्र नागरिकांची वाढती नाराजी व संताप लक्षात घेत रविवारी अखेर प्रशासन नरमले. हे बांधकाम पाडण्याचे आदेश पालिका मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी दिल्याने रविवारी दुपारी बांधकामावर कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)>‘लोकमत’च्या पाठिंब्याने यशमुळात नागरिकांच्या लढ्याला ‘लोकमत’ने पाठिंबा दिल्याने हे यश मिळाले आहे. शास्त्रीनगर हा भाग अतिशय शांत भाग म्हणून ओळखला जातो. येथील नेहरू उद्यान शहरातील हे एकमेव चांगल्या दर्जाचे असून, स्थानिक आणि शहरातील सर्व भागातील आबालवृद्ध, लहान मुले यांना याच उद्यानाचे आकर्षण आहे. जे काम पालिका करीत आहे ते नियमबाह्य आहे.नगर पालिकेच्याकारभाराबाबत कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या तक्रारी करण्यात आली होती.त्यामुळे यावर ते आता काय कारवाई करतात याकडेच रहिवाशांचे लक्ष लागले होते. आणि आत्ता हे बांधकाम हटविण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.-नेहरु उदयान बांधकाम विरोधात स्थानिक नागरीकांचा वाढलेला विरोध लक्षात घेत या उदयानातील सुरू असलेले बांधकाम त्वरित बंद करु न, झालेले बांधकाम पाडण्याचे आदेश अभियंत्यांच्या अहवाल आल्या नंतर तात्काळ रविवारी दिले. प्रशासनाने सुटीच्या दिवस असुनही, बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच याबाबत चौकशी करुन संबधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- दीपक सावंत, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका
नेहरू उद्यानातील बांधकाम हटविले
By admin | Published: June 13, 2016 3:16 AM