समीर देशपांडे, कोल्हापूरगणेशोत्सवाला विधायक वळण देण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना आता हळूहळू यश येत असल्याचे चित्र करवीरनगरीत दिसत आहे. यंदा तर डॉल्बीमुक्तीसाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, तरुण मंडळांच्या कार्यक र्त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश मंडळांना राजकीय मंडळींचा वरदहस्त असतो. अशातच पंधरा वर्षांपूर्वी गुटखा कंपन्यांनी अनेक मंडळांना प्रायोजकत्व दिले. मोठमोठ्या रकमा देऊन स्वागताच्या मोठ्या कमानी मंडपात दिसू लागल्या. याविरोधात सुरुवातीला कोल्हापुरातून आवाज उठविला गेला. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे सुरेश शिप्पूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाच्या सर्व बाजूंवर काही वर्षे सातत्याने दबाव आणत, या गुटख्याच्या कमानी लावणे बंद करण्यात यश मिळविले. त्यानंतर, जलसाठ्यांच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी म्हणून चळवळ सुरू झाली. त्यातूनच निर्माल्य दानालाही चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. मूर्तिदानालाही भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक जण उत्स्फूर्तपणे अंगणात बादलीत, काहिलीत मूर्ती विसर्जित करत आहेत. गेल्या आठ-दहा वर्षांत डॉल्बीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. डॉल्बीच्या भिंती उभारून मंडळाची ताकद दाखवण्याची प्रथा कोल्हापुरात सुरू झाली. त्याला पेठांच्या अस्मितांची झालर दिसू लागली. मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर परिसरात डॉल्बी लावून देण्याची स्पर्धा सुरू झाली. मग यातूनच एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा काही वर्षांपूर्वी खून झाला, तर डॉल्बीमुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. डॉल्बीच्या तालावर बेभान नाचणारे कार्यकर्ते मग तुझा गणपती पुढे की माझा, यावरून तलवारी उपसायला लागले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या काळात डॉल्बीला थोडा चाप लागला. मात्र, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून विश्वास नांगरे-पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर, त्यांनी डॉल्बीमुक्तीला प्राधान्य दिले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यात अथक प्रयत्न करून मंडळांना परावृत्त केले. अनेक मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे लिहून दिले आहे.
कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचा विधायक पॅटर्न
By admin | Published: September 11, 2016 4:04 AM