मुंबई : ग्राहक हिताच्या संरक्षणासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ग्राहक सल्लागार समिती सरकारने ग्राहकदिनीच तडकाफडकी बरखास्त केली होती. सरकारला अपेक्षित असलेले काम न केल्यामुळे समिती बरखास्त करण्याचे कारण सरकारी निर्णयात देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा ही समिती पुनरुज्जीवित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.ही समिती पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला असून या समितीवर औरंगाबद येथील अरुण देशपांडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती तीन वर्षांपर्यंत कार्यरत असणार आहे. राज्यात ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण भागात पसरविण्यासाठी २००१ मध्ये सरकारने ग्राहक सल्लागार समितीची स्थापना केली होती. ग्राहक चळवळीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना या समितीने सरकारला सुचवायच्या होत्या. त्याप्रमाणे या समितीचे काम न झाल्याने ही समिती बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांची नियुक्ती रद्द झाली आहे.ग्राहक कल्याण निधी म्हणून या समितीला सरकार कोट्यवधींचा निधी देत असतो. आतापर्यंत या समितीकडे ८० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या निधीचा वापर आतापर्यंत एकाही सल्लागार समितीने केलेला नाही. (प्रतिनिधी)
ग्राहक कल्याण सल्लागार समिती पुनरुज्जीवित!
By admin | Published: June 25, 2015 1:44 AM