मुंबई : महावितरणने येत्या दोन वर्षांसाठी विजेच्या दरात वाढ करून मिळावी, म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची याचिका दाखल केली असतानाच, आता राज्यभरातील विविध ग्राहक संघटनांसोबत वीज ग्राहकांनीही या वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे, तर दुसरीकडे विजेच्या दरांत वाढ का करावी लागत आहे, याची अनेक कारणे महावितरणने स्पष्ट केली आहेत.वीज दरवाढीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी महावितरणने दरवाढ याचिकेवरील चर्चासत्र आयोजित केले आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता घिया हॉल, टेक्स्टाईल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर शेजारी, काळा घोडा, मुंबई येथे हे चर्चासत्र होणार आहे. राज्यातील सर्व जाणकार वीज ग्राहक, ग्राहक प्रतिनिधी, वीज क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध रहिवासी, औद्योगिक, व्यापारी, शेतकरी व ग्राहक संघटनांचे पदाधिकारी या चर्चासत्रात सामील होणार आहेत.
विजेचे बिल का वाढणार?वीज नियामक आयोगाने २०२० -२१ वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना महावितरणसाठी जो महसूल अंदाजित केला होता, तो कोरोना महासाथ आणि कोळशाच्या संकटामुळे वाढलेला खर्च यासह विविध कारणांमुळे गोळा झाला नाही. परिणामी, गेल्या चार आर्थिक वर्षांतील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करता, महावितरणने आगामी दोन वर्षांत भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.
ग्राहकांमध्ये काय भावना?दरवाढीच्या विरोधात ग्राहकांना तोंड द्यायलाच नको, म्हणूनच हेतुपुरस्सर ई-फायलिंग व ई-हियरिंग जाहीर केले आहे, अशी भावना ग्राहकांमध्ये दिसून येत आहे. प्रचंड बोजा पडल्यास राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना दैनंदिन इतकी महागडी वीज वापरणेही परवडणार नाही.- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.दरवाढीमध्ये काय आहे?महावितरणने सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी अनुक्रमे १४ टक्के आणि ११ टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित केली असून, ही सरासरी प्रस्तावित दरवाढ एक रुपयाच्या जवळपास आहे. प्रस्तावित सरासरी दरवाढीमध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा समावेश केलेला आहे.- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण.