प्रशांत माने । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्ण शहरांमध्ये आढळत आहेत. असे असतानाही महापालिका प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने रस्त्यांवर राजरोसपणे खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्या सुरू असल्याचे चित्र सध्या कल्याण-डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे. यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव व्हावा, अशी काळजी पालिकाच घेत आहे का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूबरोबरच गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. या एकंदरीतच आजारांचा गेल्या महिनाभरातील आढावा घेता महापालिका हद्दीत आतापर्यंत स्वाइनमुळे तीन जणांचा बळी गेला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्याच्या ऊनपावसाच्या बदलत्या हवामानात साथीचे आजारही बळावण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिनाभरात तापाचे चार हजार ६१६ रुग्ण आढळले होते. यात गॅस्ट्रोचे ५९, कावीळ ४४, टायफॉइडचे ६३, मलेरिया ३९, कॉलरा आणि डेंग्यूचा प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश होता. यातील काही रुग्ण हे केडीएमसी हद्दीबाहेरील होते, असा दावा वैद्यकीय आरोग्य विभागाकडून केला जात आहे. असे असले तरी महापालिका हद्दीत या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. दरम्यान, एकीकडे स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याने जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग पाहता स्पष्ट होत असताना दुसरीकडे पावसाळ्यात बंदी घालण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरू असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. चायनीज, वडापाव, भुर्जीपाव, पावभाजी, पाणीपुरीविक्रेत्यांचा धंदा हातगाड्यांवर जोरदार सुरू आहे. >डोंबिवलीत हातगाड्यांकडे दुर्लक्ष : डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड, इंदिरा गांधी चौक, नेहरू रोड, एमआयडीसी परिसरातील निवासी विभाग, पश्चिमेकडील काही भागांमध्येही जोमाने खाद्यपदार्थांची विक्री चालू आहे. सध्या, डोंबिवलीत स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे. परंतु, या कारवाईदरम्यान सर्रासपणे अशा खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांकडे फेरीवालाविरोधी पथकांचे दुर्लक्ष होत आहे.हप्तेखोरीतून मिळतेय अभय : पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असतानाही राजरोसपणे खाद्यपदार्थांच्या हातगाड्या जोमाने सुरू आहेत. सत्ताधारी आणि अधिकारी यांच्या हप्तेखोरीत त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. यावर ‘लोकमत’ने फेरीवालाविरोधी पथकाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.>कल्याणमध्ये येथे लागतात गाड्याकल्याण पूर्वेला स्थानक परिसर, नेतिवलीचा भाग, चक्कीनाका, कोळसेवाडी, लोकग्राम असो अथवा पश्चिमेकडील स्थानकाला जोडून असलेल्या स्कायवॉकखाली, बसस्टॅण्ड परिसर, गोदरेज हिल, लालचौकी, बिर्ला कॉलेज, प्रेम आॅटो उल्हास नदीच्या बाजूला, शिवाजी चौक, आंबेडकर रोड परिसर येथे खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री सुरू असल्याचे चित्र नेहमीच दिसते. काहीप्रसंगी कारवाई होते, पण ती थातूरमातूर असल्याने पुन्हा हातगाड्या जैथे दिसतात.
खाद्यपदार्थांच्या हातगाड्या जोमात
By admin | Published: July 11, 2017 4:18 AM