खलील गिरकर मुंबई : राज्यात वाइनच्या खपात गतवर्षीच्या तुलनेत २२.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीत १५.८९ टक्के वाढ झाली आहे, तर देशी दारूच्या विक्रीत १२.२ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत बीअरच्या विक्रीत मात्र सर्वात कमी म्हणजे ८.२६ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल, २०१८ ते मार्च, २०१९ या कालावधीत झालेल्या विक्रीच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली आहे.
गतवर्षी ६०.५६ लाख बल्क लीटर वाइनची विक्री झाली होती, तर यंदा ७३.९५ लाख बल्क लीटर विक्री झाली आहे. राज्यातील ६ विभागांमध्ये सर्वात जास्त वाढ कोल्हापूर विभागात ६२.४० टक्के झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात ५८.२२ टक्के, औरंगाबाद विभागात ४९.६० टक्के, नाशिक विभागात २९.१६ टक्के, पुणे विभागात २७.७७ टक्के, ठाणे विभागात सर्वात कमी म्हणजे १२.९२ टक्के वाढ झाली आहे. ठाणे विभागात सर्वात कमी वाढ मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ०.४१ टक्के, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ६.५० टक्के वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात २३.०९ टक्के, पालघर जिल्ह्यात ३९.९१ टक्के, तर ठाणे विभागात सर्वात अधिक रायगड जिल्ह्यात ४२.९१ टक्के झाली आहे.
देशी दारूच्या विक्रीत राज्यात १२.२ टक्के वाढ झालेली असून, पुणे विभागात विक्रीमध्ये सर्वात अधिक १८.८४ टक्के वाढ झाली आहे, तर सर्वात कमी वाढ ठाणे विभागात ६.१९ टक्के झाली आहे. नाशिक विभागात १३.५८ टक्के, कोल्हापूर विभागात १०.२९ टक्के, औरंगाबाद विभागात ११.५६ टक्के व नागपूर विभागात १३.८४ टक्के वाढ झाली आहे.
देशी बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीमध्ये राज्यात १५.८९ टक्के वाढ झाली आहे. ठाणे विभागात सर्वात कमी १०.२७ टक्के वाढ झाली आहे, तर औरंगाबाद विभागात सर्वात अधिक २५.२५ टक्के वाढ झाली आहे. नाशिक विभागात १९.३६ टक्के, पुणे विभागात १६.७२ टक्के, कोल्हापूर विभागात १६.१२ टक्के, नागपूर विभागात २४.१२ टक्के वाढ झाली आहे.
मुंबईतील बीअर विक्री घटली, औरंगाबाद विक्रीत अव्वलबीअर विक्रीमध्ये मुंबई शहरची विक्री ५.२४ टक्क्यांनी घटली आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्याची विक्री १.३४ टक्क्यांनी घटली आहे. मुंबईचा समावेश होणाऱ्या ठाणे विभागात राज्यात सर्वात कमी २.२५ टक्के वाढ झाली आहे. बीअर विक्रीमध्ये औरंगाबाद विभागाचा प्रथम क्रमांक असून, २४.१३ टक्के वाढ झाली आहे. नागपूर विभागात १७.६५ टक्के, नाशिक व कोल्हापूर विभागात १४.०८ टक्के, पुणे विभागात १३.५२ टक्के वाढ झाली.