धाटाव : खड्ड्यांचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा रस्त्यावर खांबनजीक कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु होती. अपघातात कंटेनर चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. कंटेनर पलटी झाल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती तर एकेरी वाहतूक व खड्ड्यांच्या अडथळ्यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. रस्त्यावर सर्वत्र काळ्या रंगाचे तेल पडल्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले.बुधवारी सकाळी वाकण बाजूकडून कोलाडकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनरवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर खांबनजीक पलटी झाला. रस्त्यात आडवा झालेल्या कंटेनरमुळे रहदारीला अडचण निर्माण झाली त्यामुळे दरम्यानच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक संथ गतीने सुरु होती. याठिकाणी काचांचा खच पडला होता तर कंटेनरच्या इंजिनचे आॅइल सर्वत्र पसरले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला. या दुर्घटनेत चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर पलटी; दोघे जखमी
By admin | Published: August 04, 2016 2:24 AM