मुंबई : वाढत्या प्रदूषण कमी करण्यासाठी दूषित हवा खेचून शुद्ध हवा सोडणारी यंत्रे मुंबईत बसविली जातील. सध्या मुंबईत एका ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर मुंबईतील मोठे सिग्नल व जंक्शन अशा ५० ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात येतील. योजना यशस्वी झाल्यास राज्यात त्याचा विस्तार करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.मुंबईसह राज्यातील विविध शहरांतील वाढत्या प्रदुषणाबाबतचा मुद्दा चर्चेला आला. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी देवनार आगीवरुन सत्ताधारी शिवसेना-भाजपातच जुंपल्याचे विधान केले. यावर बोलताना कदम म्हणाले की, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक देवनार डम्पिंग ग्राऊंडला आगी लावल्याचा संशय आहे. युपीएल कंपनीकडून देवनार डम्पिंग ग्राऊंडचे कंत्राट काढल्यानंतर आगीच्या घटना घडत आहेत. या आगी लावणारे कोण, या कंपनीच्या माध्यमातूनच आगी लावल्या जात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. याबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलीसांत तक्रारही नोंदविण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. कच-याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असून कचरा डेपोसाठी लागणाऱ्या जागेचा मोठा प्रश्न आहे. मुंबईतला कचरा तळोजा येथे नेण्यात येणार असून त्या ठिकाणी केवळ त्याची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे कुणालाही त्याचा त्रास होणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
मुंबईत बसवणार दूषित हवा खेचणारी यंत्रे
By admin | Published: March 30, 2016 12:31 AM