मुंबई : प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरिश भंबानी यांच्या हत्येसाठी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याने तब्बल १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिस तपासात उघड झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हेमाच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. त्यासाठी विद्याधर व इतरांना ही रक्कम चिंतनकडून दिली जाणार होती. अर्थात यातील मोठा हिस्सा विद्याधरला मिळणार होता. तर इतरांना उर्वरित रक्कम समान हिश्शात मिळणार होती. या सर्व आरोपींशी चिंतनने चार ते पाच वेळेस भेट घेतली होती. दरम्यान, चिंतन हा पोलिस चौकशीत सरळ उत्तरे देत नाही. तथापि, या प्रकरणातील सत्य उजेडात आणण्यासाठी पोलिस आता या आरोपींच्या चौकशीचे रेकॉर्डिंग करणार आहेत. पोलिस कोठडीत सध्या चिंतनला वर्तमानपत्र वाचण्याची आणि टीव्ही पाहण्याची परवानगी आहे. चौकशीत चिंंतन हा दिशाभूल करणारी उत्तरे देत आहे. तर या खुनात आपला हात नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे. हेमासोबतचे त्याचे सध्या नाते काय होते, याबाबत पोलिसांनी चिंतनकडे विचारणा केली.चिंतनच्या चौकशीची रेकॉर्डिंग स्वतंत्रपणे केली जात आहे. कारण इतर आरोपी आणि चिंतन यांच्या जबाबातील विसंगती पोलिसांना तपासायची आहे. तर भंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यही आता पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी मदत करीत आहेत. आम्ही या प्रकरणी पोलिसांना सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे भंबानींच्या मुलाने सांगितले. चिंतनच्या मित्रांची विचारपूस चिंतनच्या जवळपास सहा मित्रांना पोलिसांनी बुधवारी विचारपूस करण्यासाठी बोलावून घेतले होते. पोलिसांना हवे ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे या मित्रांनी सांगितले. तर पोलिसांनी सुरुवातीला चिंतनची फक्त चौकशीच केली. मात्र अटक का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चिंतनने विद्याधरला हेमाच्या स्टुडिओचे छायाचित्र काढण्यास सांगितले होते. कारण, त्याला न्यायालयात हे सांगायचे होते की, हेमाचा स्वत:चा स्टुडिओ आहे आणि तिला पैशांची, मदतीची गरज नाही.
हेमाच्या हत्येसाठी चिंतनने दिली १२ लाखांची सुपारी
By admin | Published: December 24, 2015 2:12 AM