कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या जिल्ह्यात ज्येष्ठ नाट्य कलावंतांचा अवमान झाल्याची घटना ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात घडली. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या नातेवाइकांना खोल्या मिळण्यासाठी या विश्रामगृहात ज्येष्ठ कलावंत व ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्यासह ज्येष्ठ मराठी नाट्य कलाकार रवी पटवर्धन, अविनाश पटवर्धन, गिरीश ओक यांच्यासह महिला कलाकार यांना मध्यरात्री त्यांच्या साहित्यासह बाहेर काढले. मध्यरात्री बाहेर काढल्यानंतर रात्रभर अस्वस्थ झालेल्या या ज्येष्ठ रंगकर्मींनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली.गिरीश ओक म्हणाले, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे मंगळवारी रात्री ‘तुज आहे तुजपाशी’ हे नाटक होते. या नाटकाच्या सादरीकरणासाठी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आम्ही सर्व कलाकार मंगळवारी सकाळी आलो होतो. राहण्यासाठी आयोजकांनी सर्व कलाकारांची व्यवस्था ओरोसच्या शासकीय विश्रामगृहावर केली होती. त्यामुळे तेथील खोली ताब्यात घेऊन विश्रांती घेतली व सायंकाळी नाट्यगृहाकडे गेले. रात्री नाटक सुरू असताना काही शासकीय कर्मचारी तेथे येऊन आमच्याकडे रूमची चावी मागितली. यावेळी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या पाहुण्यांसाठी खोली द्यायची आहे. त्यामुळे तुमचे साहित्य घेऊन तुम्ही खोल्या खाली करा, असे सांगितले. यावेळी त्यांनी रूमच्या चाव्या दिल्या नाहीत. नाटक संपल्यानंतर आम्ही मध्यरात्री दोनच्या सुमारास पुन्हा विश्रामगृहावर आलो असता सर्व कलाकारांचे साहित्य हॉलमध्ये आणून ठेवले होते. (प्रतिनिधी)कलाकारांची माफी मागा : नीतेश राणेज्येष्ठ नाट्य कलाकार तसेच त्यांच्या सहकलाकारांना दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान खाली गेली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहिर माफी मागावी. - आ. नीतेश राणे
सांस्कृतिकमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवमान
By admin | Published: February 03, 2017 2:04 AM