ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - संख्याबळ अधिक असल्याने महापौर पदाचे दावेदार असलेल्या शिवसेनेला पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी जेरीस आणले आहे. खुल्या वर्गासाठी असलेल्या या पदाचे दावेदार अधिक असल्याने सेनेची पंचाईत झाली आहे. यापैकी एक दावेदार असलेले शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांना गटनेते पद देण्यात आले आहे. मात्र यामुळे महापौर पदाच्या शर्यतीतून ते पुन्हा एकदा बाद झाले आहेत.
गेली अडीच वर्षे मुंबईचे महापौर पद अनुसुचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होते. त्यावेळी यशवंत जाधव यांच्या जागेवर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत होते. यासाठी जाधव यांनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र जाधव यांना डावलून शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना महापौरपद दिले. महापालिका निवडणुकीत उतरवलेले काही ज्येष्ठ निवडून आल्यामुळे त्यांनी मोठ्या पदांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी महापौर पदाच्या शर्यतीत असलेले जाधव यांच्यावर यंदा तरी पक्ष श्रेष्ठींची कृपा होईल असे वाटत होते. मात्र शिवसेनेने आपल्या सदस्यांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना जाधव दाम्पत्यांची पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे.
यशवंत जाधव यांना गटनेते पद देण्यात आले असल्याने शिवसेना सत्तेत आल्यास ते सभागृह नेता होतील. मात्र शिवसेनेची संधी हुकली तर ते विरोधी पक्ष ननेते ठरतील. त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीतून ते आपोआपच बाहेर फेकले गेले आहेत. १९९७ पासून ते शिवसेनेत असून ते तिसऱ्यांदा नागरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नीही यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महिला आणि पुरुष नगरसेवकांमध्ये चुरस
महापौर पद यावेळेस खुले असल्याने शिवसेनेतील बड्या नागरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकच नव्हे तर महिला नगरसेवकांननीही जोर लावला आहे. पुरुष नगरसेवकांमध्ये मंगेश सातमकर, विश्वनाथ महाडेश्वर, रमेश कोरगावकर, रमाकांत रहाटे यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. तर महिलांमध्ये माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत, राजूल पटेल, शुभदा गुडेकर, किशोरी पेडणेकर यांच्यात स्पर्धा आहे.
शिवसेनेचे संख्याबळ ८८ वर
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे दोन्ही पक्षांना अद्याप शक्य झालेले नाही. तरीही प्रतिष्ठेच्या महापौर पदासाठी शिवसेनेची धडपड सुरु असून चार अपक्षांचे बळ मिळवण्यात त्यांना यश आले आहे. महापौर पदासाठी भाजपाही उत्सुक असल्याने सदस्यांची फोडाफोडी होऊ शकते. त्यामुळे आपल्या सदस्यांची तात्काळ नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने आज कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. शिवसेनेकडे पाच अपक्षांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात येत असला तरी आज ८८ सदस्यांनीच नोंदी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीही अनुक्रमे त्यांच्या ३१ आणि नऊ सदस्यांची स्वतंत्र नोंदणी केली.