ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून ३० मीटर अंतरावर खोल समुद्रात दोन दिवसांपूर्वी बोट बुडाली होती. त्यातील १४ मच्छीमारांची सुखरूप सुटका झाली असली, तरी दोन मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहे. त्यांचा शोध लागेपर्यंत नौदलाने शोधकार्य सुरू ठेवण्याची मागणी पर्सेसीन नेट मच्छीमार संघटनेने केली आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले की, रविवारी दोन पाणबुडे (डायव्हर्स) यांनी जीव धोक्यात घालून रात्रभर मच्छीमारांचा शोध घेतला. दुर्घटनेला ४८ तास उलटल्याने नौदलाच्या शोधकार्याला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे बेपत्ता मच्छीमारांचा शोध लागत नाही, तोपर्यंत नौदलाने शोधकार्य जोमाने सुरू ठेवावे. शिवाय बेपत्ता असलेल्या बोटीचाहीशोध घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. किमान बोट बुडाल्याचे नेमके ठिकाण नौदलाने कळवल्यास संघटनेतील मच्छीमार सदस्य बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील, असेही नाखवा यांनी सांगितले.