मुंबई : मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरूअसलेली संततधार मंगळवारीही कायम राहिली. मुसळधार पावसामुळे उपनगरात तीन घरांची पडझड झाली. त्यात दोघे जखमी झाले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. शहर परिसरात पावसाने सकाळी थोडी उघडीप घेतली. पण दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सायंकाळपर्यंत शहर परिसरात ४०.३९ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ६५.१५ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात ८३.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उपनगरांत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही भागांत पाणी साचून वाहतूककोंडी झाली. पूर्व उपनगरात तीन ठिकाणी घराचा काही भाग आणि भिंत पडल्या. तर शहरात १, पश्चिम उपनगरात १ आणि पूर्व उपनगरात १ अशा तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कोणालाही इजा झालेली नाही. पश्चिम उपनगरांत सहा ठिकाणी झाडे पडली. (प्रतिनिधी)>दोघे जखमी : मध्यरात्री १२.३९ वाजता विक्रोळी पार्कसाइट येथील गिरी चाळीचा काही भाग माने चाळीवर पडल्यामुळे तीन घरांच्या छताचे नुकसान झाले. त्यात दोघे जखमी झाले. मनोज यादव (३२) आणि सचिन ओडके (३०) अशी जखमींची नावे आहेत. जमखींवर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. >चार दिवस कोसळणार : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी चार दिवस मुंबईत मुक्कामाला आहे. शहरासह उपनगरांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. काही भागांत काही वेळासाठी पाऊस थांबला तरीही जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. >हा परतीचा पाऊस नाही : सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू झालेला हा पाऊस परतीचा पाऊस नाही. मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तर पश्चिम उपनगरातील चक्राकार स्थितीतील वातावरण आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मुंबईत पाऊस सुरू झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.
मुंबईत संततधार सुरूच
By admin | Published: September 21, 2016 5:48 AM