- डॉ. नीरज देव स्त्रीच्या संदर्भात पुरुष व पुरुषाच्या संदर्भात स्त्री असा विषय ज्या-ज्या वेळी निघतो, त्या-त्या वेळी ‘विरुद्धलिंगी’ असा शब्दप्रयोग हमखास केला जातो. अगदी मानसशास्त्रीय तपासणीतसुद्धा अनेकदा विचारले जाते, ‘विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबत तुम्हाला अवघडल्यासारखे वाटते का?’ इ.मला तर प्रश्न पडतो, या जगात खरोखर कोणी विरुद्धलिंगी असते का? भिन्न लिंगी असू शकतात, पण विरुद्धलिंगी नसतात. जर तसे असते, तर मग स्त्री-स्त्री व पुरुष-पुरुषातील समलिंगी आकर्षण वांझोटे ठरले नसते अन् स्त्री-पुरुषांतील आकर्षण अकृत्रिम व आणि हो, स्त्रीच्या पोटी पुरुषाचा जन्म कसा काय झाला असता?खरे सांगायचे, तर स्त्रीशिवाय पुरुषाला व पुरुषाशिवाय स्त्रीला पूर्णत्वच नाही. कदाचित असेही असेल पुरुष स्वत:चे सुप्त स्त्रीत्व पत्नीत व स्त्री स्वत:चे सुप्त पुरुषत्व पतीत पाहात स्वत:चे अपूर्णत्व भरून काढीत असतील. परस्परांवरील प्रेमामुळे परस्परांचे दोषही गुण वाटू लागावे, एवढे एकत्व दोघांत निर्माण होत असावे, निदान व्हायला हवे. ‘जगातील सर्वांत उत्कट प्रेमात स्त्री-पुरुषाचे प्रेम होय,’ अशी पावती विवेकानंदांनी दिली आहे. वास्तवातही हेच दिसते. स्त्री-पुरुषाच्या मीलनातून सारा संसार चालतो. ते एकमेकाचे विरोधी नसतात, तर पूरक असतात.मग ही विरुद्धलिंगाची भानगड आली कुठून? पाश्चात्त्यांच्या opposite sexच्या माऱ्यातून तर नसेल ना? बरे हे opposite sex कशावर अवलंबून असते? केवळ चार-दोन शारीरिक भेदांवर! मूलत: पाश्चिमात्य तत्त्वचिंतनाचा सारा भार शरीरावर असतो. त्यामुळे असेल कदाचित फ्राइडलाही वाटायचे की, पुरुषासारखे लिंग मला नाही, म्हणून स्त्रीमध्ये न्यूनत्वाची भावना पैदा होत असावी. त्याला त्याने स्त्रीमध्ये असणारी वृषण असूया (Penis Envy) म्हटले, पण त्याच्याच शिष्येने करेन हार्नीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशी असूया स्त्रीमध्ये नसतेच, उलट आपण स्त्री आहोत, स्त्रीच राहावे, असे तिला वाटत असते, पुरुषालाही आपण पुरुषच राहावे असे वाटते. याचाच अर्थ, आपापल्या लिंगात दोहोंनाही आनंद वाटतो. मग न्यूनत्व येते कोठून? मला वाटते ते येत असावे पुरुषलक्षी समाज रचनेतून? त्यातच लिंगभिन्नतेला विरोधी मानल्यामुळे उच्च-नीचतेचा भाव खोलवर रुजत असावा अन् कळत नकळत एकत्वाची जाणीव हरवली जात असावी. त्यातूनच निर्माण होत असावा लिंगाधारित जातिभेद. त्याची झळ दोहोंनाही कोठे ना कोठे जाणवते. स्त्रियांना झळ बसते हे तर सारेच मान्य करतील, पण पुरुषांना ती बसते, यावर चटकन कोणी विश्वास ठेवणार नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या बाता करणारी, पण ऐन वेळी स्त्रीत्वाची ढाल पुढे करणारी बेगडी स्त्री हक्कवादी मंडळी त्याचेच तर प्रतीक नव्हेत काय?मानसशास्त्र तर सांगते, लिंगसापेक्ष व्यक्तीपेक्षा उभयलिंगी गुण धारण करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने परिपक्व असते. म्हणजे निग्रहीपणा, धाडसीपणा, कणखरपणा, संयमीपणा या पुरुषी समजल्या जाणाऱ्या गुणांसोबतच भावनाशीलता, दयाळूपणा, समजूतदारपणा या तथाकथित समजल्या जाणाऱ्या स्त्रीच्या गुणांचे संमिश्रण एखाद्या व्यक्तीच्या ठायी असणे होय, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष. मग असे जर आहे, तर मग आपण आपल्या लिहिण्या-बोलण्यातून हा विरुद्धलिंगी शब्दच वगळला व पूरक लिंगी वापरला तर... तर किमानपक्षी हा भेद कमी करण्याच्या दिशेने आपण एक पाऊल उचलले असे होईल. मला तर वाटते, ती लिंगनिरपेक्षत्वाकडे होणारी आपली वाटचाल असेल.
drneerajdeo1@gmail.com