वालचंदनगर : (जि. पुणे) : एकाच यानातून १०४ सेटेलाईटचे प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या अभियानात ग्रामीण भागातील वालचंदनगर कंपनीने मोलाची कामगिरी केल्याने या जागतिक विक्रमामुळे कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. या यशाबद्दल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लाई यांच्यासह कामगारांनी पेढे व साखर वाटून आनंद व्यक्त केला. १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत वालचंदनगर कंपनीने मोलाची कामगिरी बजावली आहे. एस.१३९ हेड एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल डायव्हर जेट आफ्ट एन्ड व पीएम ओएक्सएल मोटार केस या उपकरणाची निर्मिती वालचंदनगर कंपनीत करण्यात आली. याचा उपयोग यानाच्या उड्डाणासाठी झिरो व पहिल्या स्टेजसाठी केला जातो. कंपनी गेल्या ४५ वर्षे संशोधन क्षेपणास्रासाठी लागणारी विविध उपकरणे तयार करीत आहे. आक्टोबर २००८ मधील चांद्रयान तसेच नोव्हेंबर २०१३ मधील मंगलायान मोहिमेतही कंपनीचा सहभाग होता, असे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लाई यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘इस्रो’च्या विक्रमात ‘वालचंदनगर’चा वाटा
By admin | Published: February 17, 2017 2:50 AM