मुंबई/ पुणे : सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ साहित्यिक, कृतिशील संपादक, स्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विद्याताईंच्या सामाजिक कार्याशी जोडलो गेल्याने त्यांची तळमळ मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. स्त्री सक्षमीकरण चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.अजित पवार शोक संदेशात म्हणाले , दिवंगत विद्याताई स्त्रीहक्क चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या होत्या. शहरेच नव्हे तर ग्रामीण भागात, गावखेड्यांपर्यंत त्यांचं कार्य पोहचलं होतं. समाजातील सर्व घटकांमधील स्रीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवनभर विधायक संघर्ष केला. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षणसंस्था विद्याताई व सहकाऱ्यांनी पदरमोड करुन 1951 मध्ये उभी केली, वाढवली, त्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मलाही मिळाली. विद्याताईंनी अनेक संस्था व माणसं कष्टपूर्वक उभी केली. त्यांनी 'नारी समता मंच ' संघटनेच्या माध्यमातून गावोगावी नेलेलं ह्यमी एक मंजुश्री हे प्रदर्शन स्त्रीहक्क चळवळीतील आश्वासक टप्पा होता. राज्यातील महिलांना संघटीत, हक्काविषयी जागरूक, सक्षम करणं हीच विद्याताईंना श्रध्दांजली ठरणार आहे.**
विद्याताईंचे स्त्री सक्षमीकरणातील योगदान सदैव स्मरणात राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:35 PM