राजू काळे/ ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. 14 - राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना विविध योजनांतर्गत पुरविण्यात आलेल्या धान्यावर थेट डिजिटायझेशनच्या माध्यमातून पॉज मशिनमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनिंगचा काळाबाजार लवकरच संपुष्टात येणार असल्याची माहिती राज्य ग्राहक आयोग तसेच अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी लोकमतला दिली.मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील ग्राहकांसंबंधी उपलब्ध योजना व सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी देशपांडे बुधवारी पालिका मुख्यालयात प्रथमच आले होते. त्यांनी पालिकेसह पुरवठा कार्यालयासह, अन्न प्रशासन, वजने व मापे महामंडळातील अधिकाऱ्यांद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला. यावर माहिती देताना त्यांनी राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणारी अडचण व त्यात होणारा भ्रष्टाचार लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत अधिकृत रेशनिंग दुकानदारांना मिळणाऱ्या धान्य पुरवठ्यावर वरिष्ठ स्तरावरून पॉज मशिनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यात घोटाळा होणे अशक्य ठरणार आहे. राज्य सरकारकडून दुकानदारांना पॉज मशिन पुरविण्यात येणार आहे. यामुळे दुकानदारांना धान्य पुरवठ्याची कागदोपत्री नोंद ठेवणे आवश्यक ठरणार नाही. मशिनद्वारे रेशनकार्डधारकांचे थम्ब इम्प्रेशन संग्रहित केले जाणार आहेत. नोंदणीकृत ग्राहकाने रेशनचे धान्य खरेदी केल्यास त्याची नोंद त्या मशिनद्वारे थेट रेशनिंग कार्यालयासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत दुकानदाराने विकलेल्या धान्य पुरवठ्याचे प्रमाण वेळीच तपासले जाणार आहे. तरीदेखील दुकानदाराने काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती मशिनद्वारे मिळुन दुकानदारावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या वस्तूचा दर, दुकानदाराकडून अधिकतम मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त वसूल केल्यास तो गुन्हा ठरतो. अनेकदा शीतपेटीतील (फ्रिज) मिनरल वॉटरच्या बाटल्या ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्या जातात. हे बेकायदेशीर असुन त्याप्रकरणी विक्रीदारावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आला आहे. ग्राहकांनी त्याची तक्रार (०२२) २२८८६६६६ या क्रमांकावर करावी, असे आवाहन त्यांनी केले. कारवाईचा अधिकार वजने व मापे महामंडळाकडे असल्याची माहिती देण्यात आली.
रेशनिंग दुकानातील काळाबाजारावर डिजिटायझेशनच्या माध्यमातून नियंत्रण
By admin | Published: June 14, 2017 6:17 PM