मुंबई : ऐतिहासिक द डेव्हिड ससून लायब्ररीची वास्तू मोडकळीस आली असून अनेक ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक लायब्ररीला वाचविण्यासाठी देणगीदार स्वत:हून पुढे येत असताना व्यवस्थापनाने देणगीच नाकारण्याची अजब भूमिका घेतली आहे. कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून अध्यक्ष, खजिनदारासह १४ जणांच्या व्यवस्थापन मंडळातील ८ जणांनी राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी लायब्ररीच्या काही सदस्यांनी केली आहे. फ्रेंड्स आॅफ डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूम (एफडीएसएलआरआर) या सभासदांच्या गटाने पत्रकार परिषदेत ही मागणी केली. संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद आजगावकर आणि खजिनदार अरविंद सानप यांच्यासह आतापर्यंत ८ जणांनी राजीनामे दिले आहेत. संस्थेचा उपाध्यक्ष कौशिक ओझा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनमानी कारभार चालविला आहे. संस्थेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी १ कोटी ३३ लाखांपर्यंत खर्च होणार असल्याचा अहवाल देण्यात आला होता. ही कामे व्हावीत यासाठी काळाघोडा असोसिएशनने लागलीच ३१ लाखांचा निधी देऊ केला होता. तसेच डेव्हिड ससून यांच्या परदेशस्थ वारसांनीही काही लाखांची देणगी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, देणगीचे हे प्रस्ताव नाकारण्याचा अजब निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचा दावा एफडीएसएलआरआरने केला. (प्रतिनिधी)
डेव्हिड ससून लायब्ररीत मनमानी कारभार
By admin | Published: September 22, 2016 2:45 AM