मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या घेऱ्यात अडकलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांनी निलंबनाचे आदेश दिले. (Controversial Sachin Waze finally suspended)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी सापडलेली स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ कार तसेच कारमधील धमकीच्या पत्राचा तपास वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. तपास सुरू असतानाच ज्यांची ही कार हाेती ते ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मुंब्रा, रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी वाझे यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांच्या अटकेबरोबर निलंबनाची मागणी केली होती. अखेर गृहमंत्र्यांनी हे प्रकरण राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाझेंच्या बदलीचे आदेश दिले.
त्यानुसार, वाझेंची विशेष शाखेत बदली करून त्यांच्यावर नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली. शनिवारी एनआयएने १३ तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक केली. वाझे यांच्या करण्यात आलेल्या या अटकेनंतर सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. यापूर्वी ख्वाजा युनूस प्रकरणात २००४ मध्ये सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू हाेता. ताे पूर्ण झाल्यानंतर अखेर तब्बल १५ वर्षांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.