पुणे : सत्तेतून पायउतार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जोरदार वादंगाला सुरूवात झाली आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिलेल्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत याचे प्रत्यंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना आले. महापौर प्रशांत जगताप व शहराध्यक्ष चव्हाण यांच्यातच वाद झाला व त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा मोठाच धुरळा बैठकीत उडाला असल्याचे समजते.पक्षाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची जुन्या नगरसेवकांची ओळख व्हावी तसेच पराभूत उमेदवारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात यासाठी खासदार चव्हाण यांनी महापौर निवासस्थानी ही बैठक रविवारी दुपारी बोलावली होती. सुरूवातीला पराभूत उमेदवारांची व त्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची अशा दोन बैठका झाल्या. वाद व्हायला नको म्हणून अशा दोन बैठका घेण्याची काळजी घेऊनही खासदार चव्हाण यांना अखेरीस वादालाच सामारे जावे लागले. दोन्ही बैठकांमध्ये वाद झाले असल्याची माहिती मिळाली.निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर जगताप व त्यांच्यातच वाद झाले असल्याचे समजते. स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, विशाल तांबे व अन्य काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पक्षातीलच काही जणांनी, विशेषत: संघटनेत पदावर असलेल्यांनी विरोधात काम केल्याची तक्रार केली. त्यावर खासदार चव्हाण यांनी त्यांची नावे सांगा, ती पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येतील असे स्पष्ट करून प्रचार काळातही आपण याबाबत तक्रार करण्यास सांगितले होते याची आठवण दिली. इतकी मोठी कार्यकारिणी केलीच कशाला असे महापौरांनी विचारल्यावरून वादाला सुरूवात झाली. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळेच अनेकांची नावे कार्यकारिणीत घेण्यात आली असे खासदार चव्हाण यांनी त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही बरीच बोलाचाली झाल्याची माहिती मिळाली. अखेरीस ‘नव्याने निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांच्याशी ओळख करून घेऊ असे म्हणत खासदार चव्हाण यांनी व महापौरांनीही विषय बंद केला. अन्य काही ज्येष्ठ नगरसेवकांनीही मध्यस्थी केली व नव्या नगरसेवकांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम सुरू केला.त्यानंतर अश्विनी कदम यांनी निकालानंतर आपल्यावर काहीजणांकडून त्यांना पाडले असल्याचा आरोप होत असल्याची तक्रार केली. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवासस्थानी मोर्चा आणण्याचा प्रयत्न केला होता, पोलिस तक्रार करावी लागली असेही सांगितले. त्याची दखल घेतली असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. नव्या नगरसेवकांना त्यांनी आपापल्या प्रभागासाठी विकास कामांची यादी तयार करण्याच्या सुचना केल्या. त्यासाठी जुन्या नगरसेवकांचा मार्गदर्शन घेण्यास सुचविले. (प्रतिनिधी)>पदाधिकाऱ्यांनी काम केले नसल्याची तक्रारपराभूत उमेदवारांच्या बैठकीतही काही जणांनी निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांचे काम केले नसल्याची तक्रार केली. बहुसंख्य उमेदवारांनी मतदान यंत्रातील मतमोजणीबाबत शंका व्यक्त करीत पक्षाने यावर काही करावे अशी विनंती केली. खासदार चव्हाण यांनी त्यांना लेखी तक्रारी तसेच मोजलेली मते व यंत्रामधील मते यातील तफावतींची कागदपत्र जमा करण्यास सांगितले. मतदान यंत्र चुकीची आहेत असे सांगून चालणार नाही तर ती कशी चुकीची मोजणी करीत आहेत हे सिद्ध करता आले पाहिजे, त्यामुळे कागदोपत्री सिद्ध करता येईल असाच आरोप करा असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत वादंग
By admin | Published: February 27, 2017 12:08 AM