रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विरोधी पक्षनेत्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काढलेल्या शिवार संवाद यात्रेच्या शुभारंभालाच गटबाजीचे ग्रहण लागले. पहिली सभा कुठे घ्यावी, यावरून खडसे-गावित गटातील वाद चव्हाट्यावर आला, तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा पुनरुच्चार केल्याने नाराजीचा सूर उमटला.भाजपाच्या संवाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र सभेच्या स्थळावरून माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यात मतभेद झाले. पहिली सभा नांदरखेडा, ता.शहादा येथे होईल असे खा. हिना गावित यांनी दोन दिवसापूर्वीच जाहीर केले होते. तर सभा ब्राह्मणपुरी, ता.शहादा येथेच होईल, असे खडसे गटाने जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला. प्रदेशाध्यक्ष दानवे नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. सकाळी दानवे यांनी डॉ.हीना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर नांदरखेडा येथेच पहिली सभा घेण्याचे निश्चित झाले.अंतर्गत वादामुळे पहिली सभा तीन तास उशिरा सुरू झाली. या सभेकडे खडसे फिरकले नाहीत. मात्र त्यानंतर ब्राह्मणपुरी येथे झालेल्या सभेला खडसेंनी हजेरी लावली.
भाजपाच्या संवाद यात्रेत विसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 5:21 AM