शिर्डी/पाथरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी) येथील साईबाबांच्या जन्मभूमी विकास आराखड्यास १०० कोटी रुपयांचा निधी दिल्याने साईबाबांच्या जन्मस्थळावरून पाथरी आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला आहे. पाथरीत कृती समिती स्थापन झाली आहे, तर शिर्डीकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
साईबाबांची जन्मभूमी शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीतील साईभक्तांनी केला आहे. शिर्डीकरांनी निर्माण केलेल्या वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय पाथरी येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील बैठकीत पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला शिर्डीकरांकडून विरोध करण्यात येत आहे़ या बैठकीस पाथरीतील श्री साई संस्थानचे विश्वस्त आ़ बाबाजानी दुर्राणी, विश्वस्त संजय भुसारी, अॅड़ अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे आदींची उपस्थिती होती़
दरम्यान, याप्रश्नी ग्रामस्थ व साईभक्तांची मुख्यमंत्र्याशी भेट घालून देण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व शहर प्रमुख सचिन कोते यांनी मुंबईत शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी ग्रामस्थांचा संवाद घडवून आणावा यासाठी ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली़ दरम्यान येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देणार असल्याचे राऊत यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
सध्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहेत़ शिर्डीकरांचा पाथरीला निधी देण्यास अथवा विकासासाठी कोणताही विरोध नाही़ मात्र त्याची ओळख साईजन्मस्थान असू नये, एवढीच शिर्डीकरांची मागणी आहे़ साईबाबांनी आपला जात, धर्म कधी सांगितला नाही़ त्यामुळेच ते सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत़ त्यांची ओळख अबाधित राहावी यासाठी शिर्डीकरांनी पाथरीच्या विकासाला नाही तर जन्मस्थान या उल्लेखाला आक्षेप घेतला आहे़ दरम्यान या प्रश्नी चर्चा करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात प्रमुख ग्रामस्थांची लवकरच बैठक होणार आहे.शिर्डीकरांनी पुरावे द्यावेत!पाथरी ही श्री साईबाबा यांची जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत़ विकासापासून अनेक वर्षे दूर असलेल्या या श्री सार्इंच्या जन्मभूमीच्या विकासाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर चालना मिळाली़ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असताना शिर्डीकरांनी नाहक विरोध सुरू केला आहे़ श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळासंदर्भात त्यांनी पुरावे सादर करावेत, असेही आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले़