आविष्कार देसाई -
रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच जिल्ह्याच्या राजकारणात आता राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन येथील कार्यक्रमात शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबाेल करीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची राजकीय जुगलबंदी रंगणार असल्याचे चित्र आहे.राज्यातील सत्ता सांभाळण्याचे काम आपले नेते करतील, तुम्हाला आणि मला आपले गाव सांभाळायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. श्रीवर्धन येथे पक्षप्रवेश कार्यक्रम साेमवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. दाेन्ही काँग्रेस एकमेकांचे ताेंड पाहत नव्हत्या. त्यांच्या विचारांची सांगड नाही. त्यांचे एकमेकांबराेबर जमतही नाही. दाेन्ही काँग्रेस एक विचारांची हाेऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेसी विचारांची कशी हाेईल, असा परखड सवाल गीते यांनी करून, राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या मित्रपक्षांवर हल्लाबाेल केला. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. राज्यात आघाडीचे सरकार असले तरी आम्ही आघाडीचे सैनिक नाही, तर आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहाेत, असे सांगत, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काेणत्याही पक्षांशी युती - आघाडी करायची नाही, तर स्वबळावर लढवायच्या आहेत, असे गीते यांनी अधाेरेखित केल्याने आगामी निवडणुकांमध्येदेखील मविआतील घटकपक्षांमध्ये असलेला विसंवाद प्रखरतेने जाणवू लागला आहे.
ज्या दिवशी आघाडी तुटेल, त्यावेळी तुम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहात का, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. शेवटी तुम्हाला आपल्याच घरी यायचे आहे. यासाठी आपले घर टिकवायचे आहे, मजबूत करायचे आहे, सांभाळायचे आहे. यासाठी एकजुटीने एकत्र या.- अनंत गीते, माजी खासदार, शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवरच निशाणाआमचे नेते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. आम्ही कोणालाही आमचा नेता मानत नाही. अन्य काेणाला जाणता राजा म्हणाे, परंतु ते आमचे गुरू नाहीत. आमचे गुरू बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजाेड आहे. जाेपर्यंत टिकून आहे, ताेपर्यंत असल्याचा दावाही त्यांनी केला.
वातावरणनिर्मितीराज्यातील सत्तेमध्ये शिवसेना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे. शिवसेनेबाबत वातावरण सकारात्मक असल्याची धारणा शिवसेनेचे नेते, पदाधिकाऱ्यांची आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या, असे मनसुबे शिवसेनेचे दिसत असून त्याचीच वातावरण निर्मिती गीते यांनी श्रीवर्धन येथून केल्याचे बाेलले जाते.