ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.5 - मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजपाच्या युतीवरुन भाजपमध्येच मतभेद असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार, असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी केला. मात्र यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याशी फारकत घेत, 'ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही', असे स्पष्ट केले. मुंबई मनपाची आगामी निवडणूक भाजपा लहान-मोठ्या घटकपक्षांच्या सोबतीने पालिकेतील 227 जागा लढवणार आणि बहुमताने जिंकणार, असे सोमय्या यांनी म्हटले. तसेच मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माफियाराज संपवणार, असे सांगत शिवसेनेवर टीकाही केली. सोमय्या यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. यामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले गेले आहेत. सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे यात आणखीनच भर पडणार आहे.दरम्यान, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला लेचीपेची समजू नका, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मर्यादित वेळेपर्यंत वाट पाहू, अन्यथा स्वबळावर लढू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
Mumbai BJP will contest on 227 wards for BMC elections alone, will end the corruption of Shiv Sena: Kirit Somaiya, BJP pic.twitter.com/ZgSAhHbXPR— ANI (@ANI_news) October 5, 2016