Praful Patel ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या सगळ्या वादंगानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला आहे.
जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ."
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीकडून होणारा शाब्दिक हल्ला थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाना पटोलेंनी काय म्हटलं होतं?
प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, "हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणाऱ्या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी", अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.
दरम्यान, "प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?" अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. तसंच जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्यात पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, असं शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.