सोलापूर - पक्षाने मला युवकांचा प्रदेशाध्यक्ष, संघटनेतील विविध पदे दिली मात्र लाभाचं पद दिले नाही. त्यामुळे मी पक्षाचा लाभार्थी नाही. जर लाभार्थी असेल तर अजितदादांनी जी संधी दिली तोच लाभ आहे. अजितदादांनीच मला मोठे केले. अजितदादांनी मला ताकद दिली, नाव दिले. त्यामुळे दादा काय बोलले याचे वाईट नाही. मोहोळ तालुक्यात अत्याचारी राक्षस पुन्हा बसू नये यासाठी माझी लढाई आहे. मी माझ्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवलाय. ४-५ दिवस वाट पाहणार असं सांगत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत वादावर संताप व्यक्त केला आहे.
मोहोळ तालुक्यात राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यात अजित पवार, सुनील तटकरेंनी उमेश पाटलांचे कान टोचले त्यामुळे नाराज उमेश पाटलांनी पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. उमेश पाटील म्हणाले की, जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार मोहोळ तालुक्यात आले होते, याठिकाणची परिस्थिती फार वेगळी आहे. राजन पाटील नावाच्या आमच्याच पक्षातील नेत्याने अप्पर तहसिल कार्यालय स्वत:च्या गावात मंजूर करून आणलं. त्यामुळे मागच्या दीड दोन महिन्यापासून या तालुक्यातील जनता प्रचंड नाराज आहे ते आंदोलन करतंय. हे तहसिल कार्यालय रद्द करा अशी जनतेची मागणी आहे. सर्वपक्षीय एकत्र येऊन लढा उभारला आहे. मोहोळ तालुका बंद पुकारून जनतेनं राजन पाटलांच्या या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही हे कडकडीत बंद पाळून सिद्ध केले आहे. मोहोळ तालुक्याचे वातावरण बदललं आहे. राजन पाटलाच्या विरोधात जनता आहे. मी राष्ट्रवादीचा मुख्य प्रवक्ता असलो तरी मी इथला लोकप्रतिनिधी आहे. मोहोळ तालुक्यातील जनतेशी बांधील आहे. लोकांसमोर मला जायचं आहे. राजन पाटील हे निवडून येणार नाहीत हे सातत्याने मी पक्षाच्या बैठकीत सांगतोय मात्र पक्ष त्यांना पाठिशी घालतोय हे मला व्यक्तिश: मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
त्याशिवाय हा पक्षशिस्तीचा भंग वाटला असेल म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असं म्हणाले. अजितदादांनी कुत्र्याची माझी तुलना केली. पक्षातील वरिष्ठ आहेत ते माझ्याबद्दल बोलले म्हणून मी नाराज नाही. मात्र माझ्याबद्दल अशी भावना असेल तर पक्षातील पदावर राहणे मला योग्य वाटत नाही म्हणून मी राजीनामा तयार केला, तेव्हा पक्षातील एका नेत्याने मला पक्षांतर्गत चर्चा करू, ४-५ दिवस थांबा असं म्हटलं. त्यामुळे मी हे पत्र माझ्याकडे ठेवले आहे. पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा मी राजीनामा देण्याची तयारी आहे. मोहोळ तालुक्याबाबत माझं म्हणणं पक्षाकडून ऐकले जात नाही ही वस्तूस्थिती आहे. राज्यस्तरावर अनेक निवडी मी सूचवल्या त्यावरून अजितदादांनी केले आहेत. माझ्या सांगण्यावरून अजितदादांनी ७ जणांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्यातील काहीजण आमदार झाले, २ मंत्री झाले, माझं ऐकलं जात नाही तर ऐकले जात होते. मात्र मोहोळ तालुक्यात राजन पाटलांचे ऐकले जाते. त्यांच्यावर अजितदादांचा विश्वास अधिक आहे. आजची परिस्थिती बदलली आहे हे समजून घ्यायला तयार नाही. राजन पाटलांविरोधातील उमेदवार निवडून येईल असं तालुक्यातील वातावरण आहे असं उमेश पाटलांनी सांगितले.
दरम्यान, पक्षात जे काही सुरू आहे ते मला पटले नाही, मी पक्षाची भूमिका मांडायला कुठे कमी पडलो? अजितदादांच्या पक्षासाठी मी समर्पित भावनेनं पूर्णवेळ काम केले. मी माझा व्यवसाय, उद्योग सांभाळत पार्ट टाईम राजकारण केले नाही. मी पक्षाचा लाभार्थी नाही. मला कुठले महामंडळ दिलं नाही, कमिटी दिली नाही. विधान परिषद दिली नाही. मी नियोजन समितीवर माझ्या हिंमतीनं निवडून आलो. जिल्हा परिषदेला जिथं राष्ट्रवादीचा कधीच निवडून येत नव्हता तिथे निवडून आलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार ही योग्य व्यक्ती आहेत हे माझे मत आजही आहे. इतकं कष्ट करतात, सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात. त्यांच्याकडे महाराष्ट्राचं व्हिजन आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी ते मुख्यमंत्री होणं कधीही चांगले. मात्र दुर्दैवाने अतिकामाच्या व्यापात जमिनीवर नेमकी काय परिस्थिती हे त्यांना समजत नाही. पोहचत नाही की चुकीचे पोहचवलं जाते हे कळायला मार्ग नाही अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली.
पक्षशिस्त सामान्य कार्यकर्त्याला लागू आहे का?
ज्या राजन पाटील आणि त्यांच्या मुलाने अजित पवारांचे फोटो जाळले, प्रतिमेला जोडे मारले, मी त्यावेळी राजन पाटलांविरोधात भूमिका घेतली त्यावेळी तुमच्या भूमिकेच्या पाठिशी उभा राहणारा उमेश पाटील होता, राजन पाटील नव्हता. राजन पाटलांनी तुमचे पुतळे जाळले. २ महिन्यापूर्वी राजन पाटलांनी पूर्ण पान जाहिराती छापल्या त्यात अजितदादांचा फोटो नाही तर रोहित पवारांचा फोटो लावला. तुतारीच्या अध्यक्षाला घेऊन सगळीकडे उद्घाटन करतात. त्यांचे नाव पत्रिकेत टाकतात. पक्षशिस्त ही प्रस्थापित आणि मोठ्या लोकांना लागू नाही फक्त सामान्य कार्यकर्त्याला पक्षशिस्त लागू आहे का असा संतप्त सवाल उमेश पाटील यांनी पक्षातील वरिष्ठांना विचारला.