मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असतानाच आणि त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रकाँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) मुंबईत येत आहेत.
मुंबई भेटीत पाटील थोरातांची भेट घेणार आहेत. ‘हात से हात जोडो’ या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत. संध्याकाळी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, सुनील केदार, विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या गोंधळावरून प्रदेश काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात वाद सुरू झाला. दुसरीकडे नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील गोंधळावरून काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन पटोले यांच्याविरोधात तक्रारही केल्याची चर्चा आहे.
थोरातांची नाराजी दूर करणार- पाटील यांच्या रविवारच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख ‘विधिमंडळ पक्षनेते’ असाच करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची जी चर्चा आहे, त्याबाबत काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट होते. - थोरात यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पाटील या भेटीत करणार असून पटोले यांच्याबरोबर आपण काम करू शकत नाही, या थोरातांनी केलेल्या तक्रारीवरही आधी थोरातांशी आणि नंतर ज्येष्ठ नेत्यांबरोबर पाटील चर्चा करणार आहेत. - या बैठकीनंतर पाटील आपला अहवाल पक्षाच्या अध्यक्षांना पाठविण्याची शक्यता असून त्यानंतर पटोले-थोरात यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.