मुंबई - महाविकास आघाडी सरकार बनवताना काँग्रेस-राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत. ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली गेली असं विधान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अरविंद सावंत यांनी सांगितलेला रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही असं स्पष्टीकरण NCP नेते अजित पवार यांनी दिले मात्र आता या विधानावरून भाजपाने समाचार घेतला आहे.
भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे विधान फार गंभीर असून श्रमशक्तीचा अपमान आहे. रिक्षा चालवणारा सरकार चालवू शकत नाही का? एकनाथ शिंदे प्रभावीपणे सरकार चालवतायेत. मीदेखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. एखाद्या सामान्य घरातील माणसं राज्य चालवतायेत हे त्यांना सहन होत नाही असं म्हणत पाटलांनी खासदार अरविंद सावंत आणि शरद पवारांना टोला लगावला आहे.
अजित पवारांनी मांडली भूमिकाखासदार अरविंद सावंत यांनी जे विधान केले. शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करून रिक्षावाला या शब्दाचा वापर केला. शरद पवारांनी नेहमी ५५-६० वर्षात राजकीय जीवनात काम करताना प्रत्येकाचा आदर केला आहे. कष्टकरी घराण्यातून शरद पवार पुढे आले आहेत. त्यामुळे असा शब्द त्यांच्याकडून कधी वापरला नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं.
ती आमची भाषा रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान खासदार अरविंद सावंत यांनी केल्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता पाहून अरविंद सावंतांनी यावर सारवासारव केली. अरविंद सावंत म्हणाले की, महाविकास आघाडीची स्थापना होताना ही वस्तूस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु रिक्षावाला हा शब्द मी वापरला. हा शब्द शरद पवारांनी वापरला नव्हता. शरद पवार असे शब्द वापरत नाहीत ही शिवसैनिकांची भाषा आहे असा खुलासा खासदार अरविंद सावंत यांनी केला.