OBC Vs Maratha Reservation Issue: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जोरदार विरोध होताना दिसत आहे. यावरून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आक्रमक झाले असून, दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच असल्याचा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचे नेतृत्व छगन भुजबळ करत आहे, अशा आशयाचे विधान करण्यात आले होते. यावर प्रसारमाध्यमांनी बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, भाजप आणि काँग्रेसही ओबीसींचे नेतृत्व करू पाहत आहे. पण भाजप आणि काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकले आहे. आता ना भाजप ना काँग्रेस, आता फक्त भुजबळसाहेब हेच ओबीसीचे नेते आहेत, असे मोठे विधान बच्चू कडू यांनी यावेळी केले.
अजित पवार आणि छगन भुजबळांची भूमिका एकच
एका बैठकीत ठरले. सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की, जातीय तणाव निर्माण व्हायला नको. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी कुणाचा एकेरी उल्लेख करु नये. मी शांत बसलो होतो तेव्हा येवल्यातील बोर्ड त्याने फाडले. मग मी कसे काय शांत बसू? अजित पवार यांनाही सांगतो आहे जर ते शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले. अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारची संमती आहे. मात्र, दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली असेल तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव ठीक होता. पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभा करायचे हे योग्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.