सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:20 PM2023-02-15T13:20:36+5:302023-02-15T13:21:19+5:30
आसाम सरकारने त्यांच्या राज्यात सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे.
पुणे: संपूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत. पण, आसाम सरकारच्या एका दाव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. आसाम सरकारने सहाव्या ज्योतिर्लिंगाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काँग्रेसने आसाम सरकारवर जोरदार टीका केली.
नेमका काय वाद?
आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने एक जाहिरात काढली आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, देशातील सहावे ज्योतिर्लिंग राज्याच्या डाकिनी टेकडीवर वसलेले आहे. ही जाहिरात येताच महाराष्ट्राचे राजकारण तापले. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विट करुन आसाम सरकारचा समाचार घेतला. मूळात, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असलेले ज्योतिर्लिंग हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून आधीच ओळखले जाते.
२/२ शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे pic.twitter.com/YFeLL9LnHo
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 14, 2023
भाजपला शंकर हिसकावून घ्यायचे
सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकर हिरावून घ्यायचे आहे. आता आसामच्या भाजप सरकारने दावा केला आहे की, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. आसाम सरकारच्या या दाव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. आसाम सरकारवर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय....! pic.twitter.com/0hsHvm8sqO
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
आध्यात्मिक वारशाची चोरी
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत आसाम सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न ठेवण्याचा भाजप नेत्यांचा निर्धार आहे का? आधी महाराष्ट्रातील उद्योग आणि रोजगार चोरीला गेला आणि आता आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा चोरीला जाणार आहे….! असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.