मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्याबरोबर ‘हॅलो’ म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.
दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या वंदे मातरम् शिवाय दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या, अशा शब्दांत रझा अकादमीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाला आक्षेप घेतला आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी सल्लामसलत करणार असल्याचे म्हटले आहे.
‘वंदे मातरम् नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात. आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात. शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात. आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे?, असे भुजबळ म्हणाले.
श्वास कसा घ्यायचा, तुम्हीच सांगणार का? आम्ही तसे म्हटले नाही, तर तुम्ही जेलमध्ये टाकणार की पोलिसांमार्फत केस करणार, असा सवाल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणावरही अशी जबरदस्ती करू नका. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी. श्वास कुठून, कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का, असा सवालही त्यांनी केला. भारतीय संस्कारात नमस्कार केला जातो. त्या नमस्कारानेच संस्कृतीची सुरुवात होते. कोणी ‘जय भीम’ बोलतो तर कोणी ‘जय हिंद’ करतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्त्वाच्या आहेत.
मुनगंटीवारांनी भूमिका बदलली?हॅलो म्हणत असाल तर ‘वंदे मातरम्’चा पर्याय दिलेला आहे. जर तुम्ही याआधी जय हिंद म्हणत असाल, जय श्रीराम म्हणत असाल, तर त्यांच्यासाठी हे नाही. काही जण फक्त फाटे फोडण्याचे काम करतात. हॅलो, या इंग्रजी शब्दाबद्दल मी सांगतोय. एवढं समजत नसेल तर चिंतेची बाब आहे, असे या वादानंतर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.