राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:23 PM2022-02-28T15:23:21+5:302022-02-28T15:23:47+5:30

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजप नेते गप्प कसे? असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे.

Controversy statement on Chh. Shivaji Maharaj by Bhagat Singh Koshyari: Congress Demanded Center should recall Governor | राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काँग्रेस

राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काँग्रेस

googlenewsNext

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी केली आहे.

कोश्यारींच्या विधानामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शिवप्रेमी संतप्त भावना व्यक्ती करत असून राज्यातील काही शहरांमध्ये राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच भारतीय जनता पक्ष(BJP) छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करत असतो हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत अशा शब्दात नाना पटोलेंनी राज्यातील भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.

Web Title: Controversy statement on Chh. Shivaji Maharaj by Bhagat Singh Koshyari: Congress Demanded Center should recall Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.