मुंबई - जागावाटपाच्या चर्चेनंतर ते बाहेर आले, मी बाहेर आलो, आमचे कपडे फाटले नव्हते ना...महाविकास आघाडी म्हटलं तर काही माध्यमांना जे घडलं नसेल ते चढवून सांगायचे असा प्रयत्न सुरू झाला आहे. महाविकास आघाडीत संजय राऊत, मी, जयंत पाटील सर्व विषयांवर सामंजस्याने मार्ग काढत आहोत. आताचे सरकार महाराष्ट्रद्रोही आणि गुजरातधार्जिणे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार घालवणे हे आमचे पहिले काम आहे. जागावाटप मेरिटच्या आधारे होतंय असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांसोबतच्या वादाच्या चर्चेवर भाष्य केले.
राऊतांच्या वादावर नाना पटोले म्हणाले की, विदर्भात जास्त जागा काँग्रेसला मिळतील. ठाकरेंनी काही जागा मागितल्यात त्यावर विचार विनिमय होत आहे. त्यांचे मेरिट असेल तर त्यांना जागा देता येतील. कोकणात शिवसेना ठाकरे गट मोठा पक्ष आहे त्याठिकाणी त्यांना अधिक जागा मिळतील. आम्ही २८८ जागा महाविकास आघाडी म्हणूनच लढू. कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नसेल. सर्व जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मतविभाजन कुठेही होता कामा नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काळजी घेऊ. ज्या जागा काँग्रेसच्या मेरिटमध्ये असतील त्या आम्ही लढू, शिवसेनेच्या असतील त्या ते लढतील आणि राष्ट्रवादीच्या ते लढतील, काही जागांवर विचार विनिमय सुरू आहे. महाराष्ट्रातलं महाराष्ट्रद्रोही सरकारला बाहेर काढणे हे आमचे टार्गेट आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही राज्यात सत्तेत येणार आहे. त्यानंतर हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू असं त्यांनी सांगितले. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्याशिवाय जे काही लोकसभेचं चित्र होते ते नरेंद्र मोदीविरुद्ध राहुल गांधी अशी लढाई होती. महाराष्ट्राने राहुल गांधींच्या पारड्यात जास्त मते टाकली. ज्यारितीने या सरकारने महाराष्ट्राला लुटलं, सगळे उद्योग गुजरातला पाठवले. उद्योग ओढण्याचं काम सुरू आहे. गुजरातचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रात सरकार नाही. राज्यात किती उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर आले त्याचे आकडे द्या. उद्योग आणले असा सरकारचा दावा असेल बेरोजगारी का वाढतेय? ज्या राज्याने उद्योगात प्रगती केली त्या राज्यात बेरोजगारी आपोआप कमी होते. फक्त राज्याच्या तिजोरीतून अनुदान दिले जाते, उद्योग चालतायेत की नाही असा सवाल नाना पटोलेंनी महायुती सरकारला विचारला.
दरम्यान, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलो. भाजपाचे १०५ आमदार निवडून दिले, त्यामुळे या लोकांनी जाणीवपूर्वक लोकशाहीची हत्या केली अशी लोकांमध्ये चीड आहे. आमदारांना विकत घेऊन म्हणजे जनमत विकत घेऊन आम्ही काहीही करू शकतो. जे संविधानिक पदावर बसलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एकनाथ शिंदेंना कुठलेही बहुमत नसताना थेट मुख्यमंत्री केले. हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने राज्यपालांवर आक्षेप घेतले. संविधाननिर्मात्यांची ही कर्मभूमी तिथेच लोकशाहीचा खून भाजपा करतेय हे लोकांना पटत नाही असा आरोप पटोलेंनी केला.
लोकशाही विकत घेणारी परंपरा पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली
माझ्या पक्षाने विधानसभा अध्यक्ष मला बनवलं, पक्षाने सांगितले राजीनामा देऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद घ्या, मी माझ्या पक्षाचा आदेश पाळणारा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मी राजीनाम्याबद्दल सांगितले. मी राजीनामा दिला, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी माझा राजीनामा घेतला, तेदेखील आमच्या सरकारमधील घटक होते. १ वर्ष आमचा अध्यक्ष होऊ दिला नाही. ज्याकाही घटना घडल्या त्या बोलक्या आहेत. लोकशाहीला विकत घेणारी परंपरा महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही अशा शब्दात पटोलेंनी भाजपावर घणाघात केला.