नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचे संकट निर्माण झाले आहे. या महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे पालन केलेले नाही. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेने या महाविद्यालयांतील संबंधित अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला असून यासंदर्भात ‘डीटीई’कडे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) शिफारस केली आहे.
नागपूर विद्यापीठाने यासाठी पथके नेमली होती व प्रत्येक पथकात ‘डीटीई’चा प्रतिनिधी होता. विद्यापीठाप्रमाणेच ‘डीटीई’च्या समितीलादेखील ३२ महाविद्यालयांमध्ये बºयाच त्रुटी आढळून आल्या. नागपूर विद्यापीठाने केलेल्या तपासणीनंतर ३२ महाविद्यालयांची यादी तयार करण्यात आली. या महाविद्यालयांमधील काही अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळल्या. मंगळवारी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या नियमित बैठकीत ही यादी मांडण्यात आली. नियमांची पूर्तता न करणाºया महाविद्यालयांवर प्रवेशबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव परिषदेने मान्य केला.
त्रुटी दूर करणा-यांना सूट
संबंधित प्रवेशबंदी ही पूर्ण अभ्यासक्रमांवर राहणार नाही. तर ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आहे त्यावरच प्रवेशबंदी राहील व जी महाविद्यालये त्रुटी दूर करतील त्यांची नावे यादीतून वगळण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून ‘डीटीई’कडे शिफारशी पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.