नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातील हुतात्म्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ‘विदर्भासाठी १०६ हुतात्मे झाले हे मुंबईकरांचे थोतांड आहे,’ असा आरोप करणारे अणे यांना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तापणार अशीच चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, महाधिवक्ता अणे यांचे वक्तव्य वैयक्तिक असून, त्याच्याशी शासनाचा संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी १०६ जण हुतात्मे झाले, असे मुंबईकरांचे सांगणे म्हणजे थोतांड आहे. मुळात त्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले होते. विदर्भ राज्याची निर्मिती शक्य आहे. जनतेलाही तेच हवे आहे व यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे अणे शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला. अणे राज्याचे महाधिवक्ता आहेत. त्यांचे असे मत दुर्दैवी आहे. ते कायदेशीर पदावर असून, घटनेची पायमल्ली करणारे वक्तव्य करणारी व्यक्ती या पदावर राहूच शकत नाही. बेजबाबदार वक्तव्य केल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. दुष्काळ, शेतकरी प्रश्न, महागाई, गुन्हेगारी यापासून लक्ष भरकटविण्यासाठीच अधिवेशनाच्या अगोदर असे वक्तव्य जाणूनबुजून केल्याचा आरोपही त्यांनी केला. महाधिवक्ता अणे यांच्याकडे राज्य शासन विविध कायदेशीर प्रकरणात मत मागते. आता विदर्भाबाबतचे त्यांचे मत म्हणजे राज्य शासनाचेच मत आहे. राज्यातील जनतेचा हा अपमान असून, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण द्यावे, असे मुंडे म्हणाले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांबद्दलचे माझे वक्तव्य अनादर करणारे नव्हते. इतिहासाला धरून ते वस्तुनिष्ठ वक्तव्य आहे. विदर्भासाठी नव्हे तर मुंबई महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी हुतात्म्यांनी बलिदान केले होते. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे. जनतेला विदर्भ नको म्हणणारे नेते कांगावा करत आहेत. काही संस्थांच्या जनमत चाचणीत जनतेने विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. केंद्र शासनाने यासंदर्भात पुढाकार घ्यावा, हे माझे मत आजही कायम आहे.- श्रीहरी अणे, महाधिवक्ता शिवसेनेची तक्रारअणे यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, वक्तव्य तपासण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले. अणे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे अथवा विदर्भाच्या प्रतिनिधित्वाकरिता या जागेचा पुनर्विचार करावा, असे ते म्हणाले.
अधिवेशनात ‘अणे’वाणी तापणार
By admin | Published: December 07, 2015 2:15 AM