औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा काँगे्रसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व चव्हाण यांनी केले. माजी मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, सततचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात आहे हे आम्ही सरकारला वारंवार सांगत आहोत. मात्र, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिका, लंडन येथे जाण्यास वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासासाठी त्यांच्याकडे आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. शासनाच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारविरुद्ध काँग्रेसनेएल्गार पुकारला आहे. आम्ही सत्तेवर असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपये, तर मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. (प्रतिनिधी)
अधिवेशन चालू देणार नाही
By admin | Published: July 11, 2015 2:06 AM