नागपूर, दि. २४ - राज्यातील शेतक-याबाबत सरकारच्या संवेदना संपल्याचे चित्र अधिवेशनातून पाहायला मिळाले असून प्रत्यक्ष रोख मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर टीका केली.आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना रोख ९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्याबरोबरच इतर अनेक माध्यमातून दुष्काळमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने आत्महत्येचे सत्र गेल्या चार वर्षात थांबले होते. त्यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची जाणीव शेतक-याला होती अशी आठवणही विखे पाटील यांनी करुन दिली. केंद्रीय पथकाने शेतक-यांची थट्टा केली. तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतक-याच्या घरात कापूस आहे पण खरेदीकेंद्र सुरू करण्याबाबत अनास्था दाखवली जात आहे. दूध उत्पादक शेतक-याचीही उपेक्षा वाढली आहे. काहीही विचारले तर आम्ही केंद्राकडे मागणी केली असल्याचे उत्तर देऊन राज्य सरकार मोकळे होते. यावरुन राज्य सरकार जनतेला मदत करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले, अशा शब्दांत विखे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतला.
अधिवेशनाचे सूप वाजले, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग - विरोधकांची टीका
By admin | Published: December 24, 2014 4:53 PM