गौरीशंकर घाळे, मुंबई एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक समस्या सुटणार असल्याचा दावा फसवा असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील चौपाट्या मात्र नष्ट होतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.बीकेसी आणि वांद्रे-वरळी सागरीसेतूनंतर प्रभादेवी, दादर, वर्सोवा येथील चौपाट्या नष्ट झाल्या. तर मनोरी व गोराईपर्यंतच्या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली. सध्या दादर येथील महापौर बंगल्यासह किनाऱ्याजवळील सर्व इमारतींमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेली दोन वर्षे थेट शिवाजी पार्कपर्यंत समुद्राचे पाणी शिरले. कोस्टल रोडमुळे ही सध्याची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता असून, सर्वच चौपाट्या आणि किनाऱ्यालगतची वस्ती पाण्याखाली येण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध समित्यांनी सुद्धा पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. सागरीसेतूबाबत १९८७ साली तत्कालीन मुख्य सचिव के. जी. परांजपे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सागरात नवीन भराव टाकण्यास मनाई करतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची शिफारस केली होती. तर १९९४ साली एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक धोरणात दक्षिण मुंबईची भौगोलिक रचना पाहता या भागात अधिकची वाहतूक न आणण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. सागरीसेतू, युतीच्या काळातील ५५ व आघाडी सरकारच्या काळातील ४२ उड्डाणपुलांनंतरही मुंबईतील वाहतूककोंडी पहिली होती तशीच आहे. त्यामुळे रस्ते व पूल निर्मितीचे धोरण सोडून वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ---------सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट व रिक्षा-टॅक्सी रस्त्याचा १६ टक्के भाग व्यापतात आणि ८६ टक्के प्रवासी वाहतूक करतात. तर कार व अन्य छोटी खासगी वाहने ८४ टक्के भाग व्यापूनही त्यातून केवळ १४ टक्के प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
कोस्टल रोडमुळे चौपाट्यांवर संक्रांत
By admin | Published: June 09, 2015 4:01 AM