मुंबई : मंत्रालय प्रवेशाचा पास मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. प्रवेशासाठी आता आॅनलाइन पास वितरणाची व्यवस्था केली असून, त्याचा आज शुभारंभही करण्यात आला. आॅनलाइन पासची माहितीच नसल्याने पहिल्या दिवशी या योजनेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, येत्या काळात याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. सामान्यांप्रमाणे गेट पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आॅनलाइन पास पद्धतीची कल्पना नसल्याचे आढळून आले. ओव्हल मैदानाच्या दिशेने असणाऱ्या ‘आरसा गेट’वर सध्या आॅनलाइन पासवर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाच आॅनलाइन प्रवेश पासबाबत माहिती असल्याचे आढळले. आॅनलाइन पद्धतीमध्ये सात दिवसांपूर्वीच पास काढण्याची सोय केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करताच स्वतंत्र विंडो ओपन होते. येथे स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर आपल्या मोबाइलवर मेसेजच्या स्वरूपात पासवर्ड येतो. हा पासवर्ड टाकल्यानंतर आपले नाव, भेट द्यायचा विभाग आणि तारीख आदी माहिती भरल्यानंतर प्रवेश क्र मांक आणि टोकन नंबरचा मेसेज आपल्या मोबाइलवर येतो. त्यानंतर दिलेल्या दिवशी हा मेसेज मंत्रालयाच्या गेटवर दाखविल्यानंतर या मेसेजच्या आधारे प्रवेशाची स्लीप दिली जाते. त्याआधारे आपल्या इच्छित विभागात जाता येणार आहे. (प्रतिनिधी)
मंत्रालय प्रवेशाच्या आॅनलाइन पासला थंड प्रतिसाद
By admin | Published: January 16, 2015 6:00 AM