लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्याने येणाऱ्या उद्योगांना मेरी टाइम बोर्डाने संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मेरी टाइम बोर्डाच्या ७२व्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या या आढावा बैठकीस बंदरे विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोर्डाच्या विविध उपक्रमांवर आधारित चित्रफीत, पुस्तिका व दिनदर्शिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, किनारपट्टीवरील उद्योग-व्यवसाय वाढला पाहिजे, नवीन येणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.प्रारंभी मेरी टाइम बोर्डातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यात सागरमाला योजनेअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प, नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टी, नव्याने सुरू करण्यात येणारे जलमार्ग, समुद्रकिनारी सुरू असलेले विविध खेळ, जेट्टीचा वापर करण्यासाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले करार, प्रवासी वाहतुकीची सद्य:स्थिती आणि सुरक्षा, वाढवण बंदराचा विकास, तुर्भे येथील बहुउद्देश्ीाय जेट्टीची निर्मिती, जयगड खाडीत शिपयार्ड प्रकल्पाची उभारणी, नरिमन पॉइंट ते बोरीवली तसेच ठाण्याच्या खाडीत जलवाहतूक सुरू करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक नवीन बंदर सुरू करणे, बंदर हद्दीत विनापरवानगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे, नागपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सी-प्लेन सुविधा निर्माण करणे आदींचा आढावा घेण्यात आला.
किनारपट्टीवरील उद्योगांना सहकार्य करा
By admin | Published: May 12, 2017 2:22 AM