ऑनलाइन लोकमतवाशिम,दि.16 - जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घटल्यामुळे, जिल्ह्यातील ११ सहकारी जिनिंग, प्रेसिंग कारखाने बंद पडले आहेत. यातील ९ कारखाने अवसायानात असून, एकाचे पुनरुज्जीवन करून तो बंद आहे, तर उर्वरित एका कारखान्यात जिनिंगऐवजी ब्रिक्वेटींग प्लांट सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात जवळपास ३५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले सहकारी संस्थांच्यावतीने ११ ठिकाणी जिनिंग प्रेसिंगचे व्यवसाय सुरू करण्यात आले होते. जवळपास ५० वर्षांपूूर्वी तत्कालीन सरकारने सहकार क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीमुळे वाशिम जिल्ह्यासह राज्यात शेकडो जिनिंग प्रेसिंगची स्थापना झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला होता; परंतु कापसाबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र घटत गेले. परिणामी सहकारी जिनिंग व्यवसाय अडचणीत आला. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काही सहकारी जिनिंग, प्रेसिंग चालविणे कठीण असल्यामुळे संबंधित सहकारी संस्थांनी ते भाडेतत्त्वावर किंवा मर्यादीत कालावधीसाठी कंत्राटीपद्धतीने चालविण्यास दिले. साधारण पाच ते सहा वर्षे ही प्रक्रिया सुरू राहिली; परंतु सहकारी संस्थांच्या कारखान्यात जिनिंग व्यवसाय करणेही व्यापाऱ्यांना परवडणारे राहिले नाही. त्यामुळे त्यांनीही हे कारखाने कंत्राटी पद्धतीने चालविणे बंद केले. त्यातच तोकड्या हमीभावामुळे शासकीय कापूस संकलन केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ केली आहे. मागील दोन महिन्यांत वाशिम जिल्ह्यात फेडरेशनला कापसाचे एक बोंडही खरेदी करता आले नाही. अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील ११ सहकारी जिनिंग, प्रेसिंग कारखाने बंद पडले आहेत.
कापसाअभावी सहकारी जिनिंग व्यवसाय बंद
By admin | Published: January 16, 2017 5:58 PM