मुंबई/ पालघर : मुंबई - पालघर जिल्ह्यातील कुपोषण प्रश्नावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे तिघेही बुधवारी कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र, मंत्र्यांचा हा दौरा निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रशासनाने तेथे जमावबंदी आदेश (कलम १४४) लागू केले आहे.मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अशा प्रकारचा आदेश लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच श्रमजीवी संघटनेचे नेते व माजी आमदार विवेक पंडित व त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना खोच व कळंबवाडी या गावांत प्रवेशास मनाई केली आहे. सवरा हे दोन दिवसांपूर्वी कुपोषणग्रस्तांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले असताना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे मुंडे यांच्या दौऱ्यातही पंडित आपल्या समर्थकांसह विरोध करण्याची दाट शक्यता असल्याने बुधवारी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)>मंत्रालयात झाली बैठक महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीला सवरा, आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, अतिरिक्त मुख्य सचिव संजीवकुमार तसेच गडचिरोली, अमरावती, नंदुरबार, पालघरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. महिला बालकल्याण, आरोग्य आणि आदिवासी विकास असे तिन्ही विभाग यापुढे कुपोषणमुक्तीसाठी हातात हात घालून काम करतील, असे पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. >या तीनही मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कडेकोट गुप्तता पाळण्यात येत होती. माहिती देण्यास जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडून टाळाटाळ होत होती. मुंडे वगळता अन्य दोन मंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीरही झाला नव्हता वा त्याची माहिती दिली जात नव्हती.
मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जमावबंदी
By admin | Published: September 21, 2016 6:26 AM